पुणे – एमएनजीएलने सीएनजीच्या (कॉम्प्रेसड नॅचरल गॅस) दरात तब्बल सहा रूपयांनी कपात केली असून, वाहनधारकांना आता सीएनजीच्या प्रति किलोसाठी 86 रूपये मोजावे लागणार आहे. महागाईने होरपाळणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळाला असून,शुक्रवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवीन दर लागू झाले आहेत.
इंधन दरात गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढ होत आहे. सीएनजीच्या दरात 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 26 रूपयांनी वाढून 92 रुपये झाला होता. सीएनजीचे दर वाढल्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि इतर सीएनजी वाहन चालकांचे आर्थिक गणित कोलमडले होते.
सीएनजी दर वाढल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षा भाडेवाढीला एक सप्टेंबर रोजी मंजुरी दिली होती. रिक्षा भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. पण, आता एमएनजीएलने सीएनजी दर 6 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला असून,सीएनजीचे दर 92 रुपयांवरून 86 रुपये प्रतिकिलो झाला आहे.