अहमदाबाद – गतविजेत्या गुजरात टायटन्सचे रविवारी होणाऱ्या आयपीएलच्या 13 सामन्यांत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या (केकेआर) सामन्यात विजयाची हॅट्ट्रिकचे लक्ष्य असेल. त्याचवेळी, शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) पराभूत केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या केकेआरला विजयी मालिका कायम ठेवायची इच्छा असणार आहे. गुजरात टायटन्सला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा तर मिळेलच, पण त्यांच्याकडे मॅच विनर्सचीही कमतरता नाही.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात युवा शुभमन गिलने 36 चेंडूत 63 धावा करत पाच गडी राखून रोमांचक विजय मिळवला, तर साई सुदर्शनने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 48 चेंडूत 62 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमीची वेगवान गोलंदाजी आणि अफगाणिस्तानच्या राशिद खानची उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीसह या दोन्ही युवा फलंदाजांना तोंड देणे केकेआरसाठी नक्कीच सोपे नसेल.
गिलने या वर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली असून त्याची धावांची भूक कमी झालेली नाही. त्याला सलामीला वृद्धिमान साहाच्या रूपाने एक चांगला जोडीदार मिळाला आहे. चौकार आणि षटकार मारण्यात तरबेज असणारा राहुल तेवतियासोबतच डेव्हिड मिलरही उत्तम फॉर्मात आहे. तर गोलंदाजांमध्ये गुजरातकडे शमी, रशीद आणि अल्झारी जोसेफ यांसारख्या चांगल्या गोलंदाजांची चांगली फळी आहे. शमीने दोन सामन्यांत पाच विकेट घेतल्या आहेत; परंतु त्याला पॉवरप्ले ओव्हर्समध्ये धावा थांबवाव्या लागणार आहेत.
दुसरीकडे, नियमित कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाल्यानंतर आणि बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने माघार घेतल्याने केकेआरने जेसन रॉयला संघात आणले. अफगाणिस्तानचा युवा यष्टीरक्षक रहमानउल्ला गुरबाजच्या सुरेख फलंदाजीनंतर आता जेसनला कुठे जागा मिळते हे पाहावे लागणार आहे.
गुरबाजने पंजाब किंग्ज विरुद्ध 22 धावा केल्या आणि आरसीबी विरुद्ध शानदार फलंदाजी करत संघाला 200 धावांची मजल मारून दिली होती. आरसीबी विरुद्धच्या 81 धावांच्या विजयात शार्दूल ठाकूरने अष्टपैलू कामगिरी केली होती. तर दिल्लीचा युवा खेळाडू सुयश शर्माने 30 धावांत तीन बळी घेतले होते. त्यामुळे गुजरात विरुद्ध केकेआरचे मनोबल वाढले आहे.