पुणे – मुंबई-उपनगरांत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 3 रुपये कपात करण्यात आली. त्यामुळे तेथे सीएनजी .प्रति किलो 76 रुपयांनी मिळत आहे. पुण्यात सीएनजी दर प्रति किलो 86 रुपये इतका आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सुध्दा सीएनजीच्या दरात कपात केली जाणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसे झाले, तर सीएनजी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
पुणे, पिंपरी -चिंचवड शहरांत सीएनजी वाहनांची संख्या मोठी आहे. मुंबई शहरात सीएनजीच्या दरात कपात केल्याने पुण्यातसुद्धा असा निर्णय होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. याविषयी एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील सहा महिन्यांपासून सीएनजीचे दर जैसे थे आहेत. त्यामध्ये वाढ केली नाही. सीएनजी दरात कपात करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतला जाणार आहे.’