शिधापत्रिका नसणाऱ्यांची अन्नधान्यासाठी नोंदणी सुरू

पिंपळे गुरव (वार्ताहर) – करोनाच्या रुपात आलेल्या महामारीमुळे संपूर्ण जगापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. भारतातदेखील मार्च अखेरपासून करोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. परंतु दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने गरजू, गोरगरीब नागरिकांची मोठे हाल होत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांजवळ रेशन कार्ड नाही अशा नागरिकांनादेखील धान्य मिळावे म्हणून शासनाने सर्वांसाठी धान्यवाटप करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांची नोंदणी सुरू झाली आहे. त्यातून गरजूंना मोठी मदत होणार आहे. त्यांची उपासमार थांबण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नोंदणी करण्यास नागरिकांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.

पिंपळे गुरवमधील सृष्टी चौक येथे शिधापत्रिका नसणाऱ्या नागरिकांची नोंदणी सुरू आहे. नोंदणी करण्यासाठी महिला व पुरुषांची मोठी रांग लागली होती. परंतु लॉकडाऊनमधील फिजिकल डिस्टन्सिंग पालन सर्वजण करत होते. बाहेरगावाहून औद्योगीक नगरीत उदरनिर्वाह करण्यासाठी आलेल्या तर काही शहरात असूनही कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नाही, अशा गरजू नागरिकांना धान्यवाटप करण्यात येणार आहे. यासाठी किती नागरिक असे आहेत त्यांना धान्याची गरज आहे. त्यासाठी फॉर्मवाटप करून त्यांची नाव नोंदणी करण्यात येत आहे. त्यांचे संपूर्ण नाव व मोबाइल नंबर लिहून घेण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जवळपास अशा 300 गरजू नागरिक व महिलांची नोंदणी केली आहे.

या वेळी फॉर्म घेण्यासाठी व भरून देण्यासाठी नागरिक, महिलांची गर्दी झाली होती. अनेक गरजू नागरिक विनाकारण गर्दी करताना दिसून येत होते. येथील कार्यकर्ता महिला फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळा असे सतत सांगून देखील काहीजण नियमांचे उल्लंघन करत होते.

पिंपळे गुरव परिसरात अनेक नागरिकांकडे शिधापत्रिका नसल्याने शासनाकडून मिळणाऱ्या अन्नधान्य योजनेपासून वंचित आहेत. अशा गरजू लोकांची नोंदणी करून त्यांना योजनेतील अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांकडून योजनेचा फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया गेली दोन दिवस चालू आहे. थोडी गर्दी होत आहे; परंतु आम्ही फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हे कार्य पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.
-उषा मुंढे, नगरसेविका

Leave A Reply

Your email address will not be published.