मान्सूनपूर्व पावसाने कराड, पाटणला झोडपले

कराड   -कराड-पाटण तालुक्‍याला सोमवारी मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले. खरीपाच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्‍त असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्‍त होत आहे. यावर्षी कराड तालुक्‍यात अवकाळी पाऊस झाला नव्हता तर पाटण तालुक्‍यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली होती. उन्हाळ्याची तीव्रता अधिक असल्याने नागरिक हैराण झाले होते. शेतकरी वर्गही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. मे महिन्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सून दाखला झाल्याने यंदा महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सुरू होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्‍त केला आहे.

दरम्यान, पूर्वेकडे झालेल्या वादळामुळे सोमवारी मान्सूनपूर्व पावसाने कराड व पाटण तालुक्‍यातील अनेक गावांना झोडपले. रिमझिम पावसाला सकाळपासूनच सुरुवात झाली होती. दिवसभर हवामान ढगाळ होते. सायंकाळी पाचनंतर मुसळधार पाऊस पडला. त्याच वेळी करोनामुळे बाजारपेठ बंद होत असल्याने सर्वांची तारांबळा उडाली. अनेकांना दुकानांचा आसरा घ्यावा लागला. रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते.

पावसाबरोबर जोरदार वारे वाहिल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतीच्या कामाची लगबग सुरू होणार आहे. येत्या दोन दिवसात शेतात पेरण्या सुरू होण्याची शक्‍यता आहे. खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग, कडधान्यांच्या बी-बियाणांच्या खरेदीसाठी कृषी सेवा दुकानांमध्ये शेतकरी गर्दी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.