क्षेत्रीय अधिकारी करणार कर वसुली

आयुक्तांचे आदेश : करसंकलन कार्यालयांच्या कामांचे विकेंद्रीकरण

पिंपरी – महापालिकेच्या 16 करसंकलन विभागीय कार्यालयांच्या कामाचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. या विभागीय करसंकलन कार्यालयाच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात येणाऱ्या मालमत्तांच्या वसुलीवर यापुढे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. महापालिकेच्या 181 चौरस किलोमीटर कार्यक्षेत्रामध्ये एकुण 32 निवडणूक प्रभाग आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी एकुण 8 क्षेत्रीय कार्यालये गठीत करुन त्यांच्या मार्फत क्षेत्रीय कामकाजाचे व्यवस्थापन करण्यात येते. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या अंदाजे 22 लाखांच्या पुढे आहे. मालमत्ता कर हा महापालिका उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.

महापालिका कार्यक्षेत्रामधील एकूण 16 विभागीय कार्यालयांमार्फत करआकारणी आणि करसंकलन केले जाते. महापालिका सेवेतील मर्यादित अधिकारी आणि कर्मचारी संख्या तसेच मालमत्ता करापासून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाच्या वृद्धीदरातील घट विचारात घेता 16 विभागीय कार्यालयांच्या कामकाजाचे क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. 16 विभागीय कार्यालयांचे सनियंत्रण आणि पर्यवेक्षण क्षेत्रीय कार्यालयांकडे सोपविण्यात आले आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या करसंकलन विभागीय कार्यालयाच्या आणि गटांच्या सिमा, हद्दी पूर्वी प्रमाणे कायम ठेवण्यात आल्या आहेत. विभागीय कार्यालयांना मार्गदर्शन करणे, त्यांच्याकडून कामकाज करुन घेण्याची संपूर्ण जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. याशिवाय विभागीय कार्यालयांचे संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण क्षेत्रीय अधिकारी करणार आहेत. तसेच नवीन कर आकारणी, वाढीव कर आकारणी, हस्तांतरणाबाबत येणारे अर्ज यापुढे फक्त संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) मधूनच स्वीकारण्यात यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.