राज्यातील राजकीय अस्थिरतेविषयी उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन म्हणाले,…

मुंबई : राज्यावर करोनाचे संकट ओढवलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वावरून राजकीय अस्थिरतेचे सावट सरकारवर फिरू लागले आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याचा ठराव दोन वेळा राज्यापालांकडे पाठवून सुद्धा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला. “राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधीमंडळ नियुक्तीसंदर्भात मध्यस्थी केली नाही, तर मला राजीनामा द्यावा लागेल,” असा इशारा ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिला.

राज्यात करोनाचा वाढत आहे तर करोनाचा धोका लक्षात घेता राज्यातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमासह निवडणूकाही रद्द करण्यात आल्या. यात जाहीर झालेली विधान परिषदेची निवडणूकही लांबणीवर गेल्यांने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वाचा मुद्दा चर्चेत यायला सुरूवात झाली.

सरकारला स्थिरता देण्यासाठी महाविकास आघाडीने त्यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकी मंजुर करून राज्यपालांना पाठवण्यात आला. त्यावर निर्णय न झाल्याने पुन्हा राज्यपालांना यासंदर्भात आठवण करून देणारा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याच्या निर्णय लांबत असल्यानं राजकीय अस्थिरता राज्यात घर करून लागली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. “करोनाचे संकट असताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होणे योग्य नाही असे सांगत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्याचबरोबर आपण मध्यस्थी केली नाही, तर मला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल,” असे ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितले. त्यावर “या प्रकरणात आपण लक्ष घालू” असे आश्वासन मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले असल्याचे एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.