नगर -नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आवारातून संरक्षण किट पळविल्याच्या त्या कथित आरोपाचा तपास करण्यास आज चौकशी समितीने नकार दिला. सरकारी रुग्णालयातील तीन डॉक्टरांची चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली होती. मात्र, ते समकक्ष असल्याने तसेच त्यांच्यावरच अतिरिक्ति दबाव आल्याने त्यांनी ही चौकशी करण्यास नकार दिल्याचे समजते.
दरम्यान, रोजच सोबत काम करणारे समकक्ष अधिकारी मित्र किंवा कनिष्ठ सहकारी अधिकाऱ्यांमार्फत केली जाणारी ही चौकशी पारदर्शी कशी ठरेल, असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते ऍड. श्याम आसावा यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली होती. ट्विटद्वारे करण्यात आलेल्या या तक्रारीवरुन काही आदेश होण्यापूर्वीच चौकशी करणाऱ्या या समितीने भविष्यात काही नवे आक्षेप किंवा आरोप होऊ नयेत, म्हणून ही चौकशी करण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संरक्षण किट पळविल्याच्या कथित आरोपाची पुढील तीन दिवसांत चौकशी पूर्ण होईल, अशी माहिती शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी दैनिक प्रभातला दोन दिवसांपूर्वी दिली होती. मात्र, चौकशी समितीत जिल्हा सरकारी रुग्णालयातीलच तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्याने जिल्हा सरकारी रुग्णालयातील यंत्रणाच अचंबित होती. नगर जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत होती. त्यावेळी पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या कक्षातील डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांसाठी 15 एप्रिलला हे किट तेथील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारले होते. दरम्यान, या प्रकाराची चौकशी सुरू असताना ज्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे, ते अधिकारी चौकशीदरम्यान तेथे उपस्थित राहात असल्याने समिती चौकशी पूर्ण करू शकली नाही, अशीही माहिती आता उपलब्ध होत आहे.
संरक्षण किट पळविल्याच्या “त्या’ कथित आरोपाचा तपास करण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयातील वर्ग एकचे दोन अधिकारी व वर्ग दोनच्या एका अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. तथापि, या तीन अधिकाऱ्यांच्या समितीने हा तपास उच्चस्तरीय व त्रयस्थ समितीमार्फत करणेच योग्य होईल, असा अहवाल दिला. त्यामुळे हा तपास उच्चस्तरीय समितीमार्फत करावा, असा अहवाल आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पाठविला आहे.
डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, अहमदनगर.