मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. खडसे यांनी यापूर्वी अनेकदा आपली नाराजी जाहीररीत्या बोलून दाखवली असल्याने त्यांच्या पक्षबदलाबाबतच्या चर्चा याआधीही रंगल्या होत्या. मात्र खडसे यांनी भाजपला रामराम ठोकण्याबाबतचा निर्णय अद्यापतरी घेतलेला नाही.
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु असून लवकरच ते पुन्हा एकदा उत्साहाने सहभाग नोंदवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील’
तत्पूर्वी ही चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला होता. एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाने त्यांना आजवर भरभरुन दिलं आहे. त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल अशी कोणतीही भूमिका ते घेणार नाहीत. याआधीही त्यांच्याबद्दल अशा चर्चा झाल्या असून त्या अफवा ठरल्या आहेत. ही देखील अफवाच ठरेल असे ही चंद्रकांत पाटील ते म्हणाले होते.