भोरच्या तालुक्यातील स्थिती : तीन किलोमीटर कंकवाडीत रुग्णालय
हिरडस मावळ – धानवली (ता. भोर) येथील महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात नेताना ग्रामस्थांना डालचा वापर करावा लागत आहे.
भोर तालुक्यातील पश्चिम भागातील हिर्डोशी खोऱ्यातील भोरपासून निगुडघर-दुर्गाडी शिरगाव या रिंगरोडवर 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कंकवाडी गावापासून तीन किलोमीटर आणि रायरेश्वर किल्ल्याच्या डोंगराजवळ 450 लोकवस्ती असणाऱ्या धानवली येथील प्रसूती कळा सुरू झालेल्या रेश्मा अंकुश पाकेरे या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी दळणवळणाची सोय नसल्याने खडतर प्रवास करावा लागला.
धानवली (ता. भोर) ते कंकवाडीपर्यंतचा 3 कि. मी प्रवासासाठी डालाचा वापर करत तेथील ग्रामस्थ रामदास धानवले, योगेश पाकेरे, नीलेश धानवले आणि महिलांनी पावसामुळे खराब असलेल्या रस्त्यातून पायपीट करत या महिलेला कंकवाडीपर्यनत आणले आणि त्यानंतर महिलेस वाहनाने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात प्रसूती सुखरूप झाल्यानंतर पुन्हा त्या महिलेस डालातच कंकवाडीपासून घरी नेण्यात आले. सहा महिन्यापूर्वी मनीषा धानवले या महिलेस प्रसूतीसाठी अशाच प्रकारे डालात नेल्याचे ग्रामस्थ महिपती धानवले यांनी सांगितले.
प्रशासनाने लक्ष घालून समस्या सोडवावी
कंकवाडी-धानवली रस्त्यासाठी आमदार संग्राम थोपटे व जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे याच्या प्रयत्नातून निधी देण्यात आला आहे. त्यातून दीड किमी रस्त्याचे काम झाले; परंतु स्थानिक शेतकऱ्यांकडून हरकतींमुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. या भागात अतिपर्जन्यवृष्टी होत असल्याने उर्वरित रस्त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे. प्रशासनाने यात लक्ष घालून रस्त्याच्या कामाची व समस्यांची पूर्तता करावी, विकासकामांसाठी ग्रामस्थांची सहकार्याची भूमिका राहील, असे ग्रामस्थ तानाजी कोंडीबा धानवले यांनी सांगितले.