रेडा -पिडीत अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला आहे. याबाबत त्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी इंदापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी अर्जाद्वारे उपजिल्हा शासकीय रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे.
लग्न करण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. सोमवारी (दि.22) यातील आरोपी व सोळा वर्षांच्या पिडीत मुलीस पोलीसांनी ताब्यात घेतले होते. दि. 24 जून रोजी मुलीचे वडील व एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासमवेत त्या मुलीची शारीरिक तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.
त्यावेळी तेथील डॉ. शिरीष साळुंखे या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सध्या कोराना आहे. आपण पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करू शकत नाही. सध्या रूग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नाहीत, असे सांगत आरोग्य तपासणी करण्यास असमर्थता दाखवली.
पिडीत मुलीस तपासणीसाठी बारामतीच्या महिला रुग्णालयात रवाना करण्यात आले. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाचे कलम 27 अन्वये पिडीत अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. डॉ. साळुंखे यांनी आपले कर्तव्य टाळुन अल्पवयीन पिडीत मुलीची हेळसांड केली आहे. अशा आशयाचे पत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. व्ही. लोकरे यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहे.
या प्रकरणी डॉ. साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधीक्षक