नवी दिल्ली : सरकारने विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सरकारकडून मोठी कपात करण्यात आली असल्याने याचा फायदा गृहिणींच्या महिनाभराच्या बजेटसाठी होणार आहे. दरम्यान, या अगोदर ऑगस्टमध्येदेखील सिलिंडरच्या किंमती कमी केल्या होत्या त्याचा ग्राहकांना फायदा मिळाला होता.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने याविषयी माहिती दिली आहे. विनाअनुदानित घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची बाजारातील किंमत आता 574.50 रुपये असेल. सिलिंडरचे हे नवे दर बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. तत्पूर्वी जुलैमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर 100.50 रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्यामुळे दोन महिन्यात एकूण मिळून विनाअनुदानित प्रति गॅस सिलिंडरमध्ये 163 रुपयांची कपात करण्यात आली आहे.