बारामती, दौंड, इंदापूर अजूनही “वेटिंगवर’

पुणे – जिल्ह्यातील बहुतांश भागांत वरूणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, बारामती, इंदापूर, दौंड आणि शिरूर तालुक्‍यांला वरूणराजाने “वेटिंगवर’ ठेवले असून, महिन्याभरात असमाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे या गावांमधील पाणी आणि चारा टंचाईचा प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही. दरम्यान, जिल्ह्यात मागील 24 तासांत मावळ तालुक्‍यात सर्वाधिक 142 मिमी पावसाची नोंद झाली.

10 दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचे दमदार पुनर्आगमन झाले. शहरासह जिल्ह्यातही पावसाला जोरदार सुरवात झाल्यामुळे शेतकरी सुखावला. मात्र, हा पाऊस मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, जुन्नर, खेड या भागांत जोरदार बरसत आहे. तर पाणी टंचाईचे संकट असलेल्या बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड या तालुक्‍याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पावसाळ्याचे दोन महिने संपूनही अजूनही टॅंकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात या तालुक्‍यातील टॅंकर बंदच होणार नाही.

2 महिन्यांत 561.8 मिलिमीटर पावसाची नोंद
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसाने ही सरासरी भरून काढली आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांत तब्बल 561.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दोन महिन्यांच्या सरासरीपेक्षा हा पाऊस दुप्पटीने अधिक आहे. दरम्यान, पुणे शहरात मंगळवारी दिवसभर 34.6 मिलीमीटर पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शहरात पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहणार आहे.

तालुकानिहाय सरासरी पावसाची आकडेवारी (मिमीमध्ये)
हवेली 20.7, मुळशी 93, भोर 77, मावळ 142, वेल्हे 104.25, जुन्नर 52.44, खेड 42.92, आंबेगांव 19.84, शिरूर 9, बारामती 6.25, इंदापूर 4.53, दौंड 5.63, पुरंदर 10.

Leave A Reply

Your email address will not be published.