भाजप दबावतंत्र चर्चेला पूर्णविराम

बारामतीतील मुख्यमंत्र्यांची सभा पुढे ढकलली

बारामती – बारामतीत दहीहंडी उत्सव व महाजनादेश यात्रेतील मुख्यमंत्र्यांची सभा 25 ऑगस्ट रोजी असल्याने दहीहंडी उत्सव पुढे ढकल्यासाठी भाजपकडून दबावतंत्र वापरला जात असल्याचे राजकारण दिवसभर चघळले गेले. मात्र, मुख्यमंत्र्यांची सभा 25ऐवजी 26 ऑगस्ट रोजी घेतली जाणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी केली अन्‌ भाजच्या दबावतंत्राच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

बारामतीत 25 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. भाजप प्रदेश कार्यकारीणीच्या वेळापत्रकानुसार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा याच दिवशी बारामतीत येणार होती. सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ही सभा होणार होती. त्याचा परिणाम दहीहंडी उत्सवावर होणार होता. पोलिसांकडूनही याबाबत दहीहंडी आयोजक मंडळांकडे उत्सव पुढे ढकलता येतो का, याविषयी चाचपणी करण्यात आली होती. एकंदरीत या विषयावरून बारामतीत वेगळे वातावरण तयार होवू पाहत होते.

दरम्यान, याप्रश्‍नी गावडे यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर महाजनादेश यात्रेचे वेळापत्रक बदलण्यात आले. 25 ऐवजी 26 ऑगस्ट रोजी ही यात्रा बारामतीत येणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. नितीन भामे, सुरेंद्र जेवरे, सतीश फाळके यांच्यासह दहीहंडी मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भाजपाने सभेची तारीख बदलण्याची मागणी केल्याने मंडळातर्फे ऍड. भार्गव पाटसकर यांनी आभार व्यक्‍त केले. दरम्यान, दहीहंडीची तारीख पुढे ढकलण्याला विरोध करण्यासाठी बारामतीतील दहीहंडी मंडाळांनी पत्रकार परिषदेद्वारे मुख्यमंत्र्यांची सभा पुढे ढकलण्याची मागणी करीत भाजच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त केली होती.

सोलापूर जिल्ह्यातून 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता इंदापूर येथे महाजनादेश यात्रा येईल. तेथून लोणी देवकर, भिगवणमार्गे बारामती तालुक्‍यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.