नवी दिल्ली -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शनिवारी जनसामान्यांना अल्पसा दिलासा देताना दरकपात केली. त्यानुसार लिटरमागे पेट्रोल 13 पैशांनी, तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त झाले.
मार्चच्या मध्यापासून सहा महिन्यांत पेट्रोलच्या दरात केवळ दुसऱ्यांदा कपात झाली. याआधी दोन दिवसांपूर्वी म्हणजे 10 सप्टेंबरला पेट्रोल 9 पैशांनी स्वस्त झाले. तर मार्चच्या मध्यानंतर डिझेलच्या दरात प्रथमच 3 सप्टेंबरला कपात करण्यात आली.
तेव्हापासून आतापर्यंत डिझेल 63 पैशांनी स्वस्त झाले आहे. सार्वजनिक कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार, दररोज किमती बदलतात किंवा जैसे थे राहतात. मात्र, ती प्रक्रिया 82 दिवस थांबवण्यात आली. ती प्रक्रिया 7 जूनपासून पुन्हा सुरू झाल्यावर 25 जुलैपर्यंत डिझेलच्या दरात लिटरमागे तब्बल 12 रूपये 55 पैशांनी वाढ झाली. तर 7 जून ते 29 जून या कालावधीत पेट्रोल 9 रूपये 17 पैशांनी महागले.
त्यानंतर 16 ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात आणखी 1 रूपया 51 पैशांची भर पडली. त्यामुळे दोनवेळा स्वस्त होईपर्यंत पेट्रोल 10 रूपये 68 पैशांनी महागले.