पाटणा: करोनाची कोणतीही लक्षणे नसताना एका महिलेला म्युकरमायकोसिस झाल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये समोर आले आहे. या महिलेवर सध्या पाटण्यातील ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सर्व नागरिकांना, विशेषत: मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींना सावधगिरीचा सल्ला दिला आहे.
आरा जिल्ह्यातील एका ४० वर्षीय महिलेला सुमारे २० दिवसांपूर्वी ताप आला होता. औषधाच्या दुकानातून तापावरील औषध आणून तिने ते घेतल्यानंतर तिचा लगेचच ताप गेला. यानंतर या महिलेला श्वास लागणे, डोळे दुखणे असा कोणताही त्रास लागला नाही, की रुग्णालयात भरती होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे तिने करोनाची चाचणीही केली नाही.
मात्र, दोन दिवसांनंतर तिच्या चेहऱ्याचा अर्धा भाग दुखू लागला आणि त्या भागातील डोळ्याने दिसणेही बंद झाले. तिचे डोळे सुजले. ऑक्सिजनची आवश्यकता किंवा अतिदक्षता विभागात नसलेल्या या महिलेमध्ये दिसलेल्या या लक्षणांमुळे डॉक्टरही चक्रावले आणि त्यांनी सिटी स्कॅन केला असता काळी बुरशी झाल्याचे आढळले. यानंतर या महिलेला ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले. या महिलेला इतर कोणता आजारही नव्हता.