15 दिवसांत मिळणार 178 डॉक्टर
पुणे – महापालिकेच्या आरोग्य विभागातील वर्ग-1 आणि वर्ग-2 च्या तब्बल 178 जागा भरण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार, पुढील 15 दिवसांत सरळ सेवा पद्धतीने ही पदे भरली जाणार आहे. त्यासाठीची जाहिरात पुढील दोन दिवसांत दिली जाणार असून त्यानंतर तातडीनं ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली. या पदांमध्ये वर्ग-1 च्या सुमारे 121 पदांचा समावेश असून वर्ग-2 च्या 57 पदांचा समावेश आहे.
शहरात करोनाचे रुग्ण वाढण्यास सुरूवात झाल्यानंतर महापालिकेकडे असलेली वर्ग-1 ची तज्ज्ञ डॉक्टरांची सुमारे 125 पदे रिक्त होती. तर वर्ग-2 ची डॉक्टरांची 57 पदे रिक्त होती. करोनाची भविष्यात शहरातील वाढती स्थिती लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या वर्ग-1 ते 4 ची सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी पालिकेने राज्यशासनाकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही पदे भरण्यास मान्यता दिली. त्यात वर्ग -1 आणि 2 ची सर्व पदे सरळसेवेने, तर वर्ग-3 आणि 4 ची पदे ठेकेदारी पद्धतीने भरण्यास मुभा देण्यात आली. त्यानंतर ही पदे कशी भरायची, याबाबत शासनाकडे विचारणा करण्यात आली होती. त्यावर शासनाने मार्गदर्शन केल्यानुसार ही प्रक्रिया होणार आहे.
गुणवत्तेवर पदभरती
ही डॉक्टर भरती करताना प्रशासनाकडून त्यांचे शिक्षण, कामाचा अनुभव, त्यांची सेवा वर्ष या बाबी विचारात घेऊन गुणवत्तेवर ही पदभरती केली जाणार आहे. तर या भरतीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच अर्ज पालिकेकडून ऑनलाइन मागविण्यात येणार असल्याने या उमेदवारांना आपल्या कागदपत्रांची पूर्ताता करण्यासाठी 15 दिवसांची मुदतही दिली जाणार आहे. शासनाने भरतीस हिरवा कंदील दिल्यानंतर पालिकेने स्काईप अथवा इतर यंत्रणेद्वारे या उमेदवारांची ऑनलाइन मुलाखत घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता डॉक्टरांची आवश्यकता लक्षात घेऊन या मुलाखतीही न घेता त्यांच्या एकूण गुणवत्तेनुसार ही पदभरती केली जाणार आहे.