पुणे – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यास लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर
कार्यालयामध्ये पक्षकारांची गर्दी टाळण्यासाठी पुणे येथील सह धर्मादाय आयुक्तांकडील सर्व प्रकरणांना जून महिन्यातील तारखा दिल्या आहेत. सह आयुक्त दिलीप देशमुख यांनी सर्व पक्षकारांना शासनाचे सर्व आदेश व वैद्यकीय सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे.
त्यास अनुसरून उपायुक्त नवनाथ जगताप, सहाय्यक आयुक्त अमरदीप तिडके, राहूल चव्हाण व राणी मुक्कावार-अडगुलवार या सर्वांनीही एक निवेदन प्रसिद्ध करून त्यांचेकडील सर्व प्रकरणांची सुनवणी तहकूब करून पुढील तारखा दिल्या आहेत. याबाबत बोलताना उपायुक्त नवनाथ जगताप म्हणाले की शासनाने लाॅकडाऊन आदेश मागे घेतल्यावर कार्यालयातील नियमित कामकाज सुरु झाल्यानांतर दोन दिवसात सर्व प्रकरणे कार्यतालिकेवर घेण्यात येऊन सुनवणीच्या पुढील तारखा देण्यात येतील, वकिलांना माहिती देण्यात येईल व तसे कार्यालयीन नोटीस बोर्डावर प्रसिध्द करून पत्रक प्रसिद्ध करण्यात येईल.
मा. उच्च न्यायालयाने विहित वेळेत निकाली काढण्याचे आदेश केलेली प्रकरणे नियमित कामकाज सुरु झाल्यावर प्राधान्याने सुनवणीस घेण्यात येतील. याविषयी पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणेचे विश्वस्त ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार म्हणाले, पक्षकारांना दिलासा देणारा निर्णय आहे.
कोर्टातील प्रकरणाची तारीख म्हणजे पक्षकारांच्या दृष्टीने फार महत्वाची बाब असते. पुणे विभागांतर्गत पुण्यासह अहमदनगर, सोलापूर व सातारा जिल्हे येतात.
लाॅकडाऊन कालावधी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षकारांमध्ये एप्रिल व मे महिन्यात नेमलेल्या सुनवणीच्या तारखांबाबत अस्वस्थता होती. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करताना कोर्टात पोहचू शकलो नाही तर काही विरूद्ध आदेश होणार नाही ना याची मनात धाकधुक असायची. मात्र पुणे विभागीय धर्मादाय कार्यालयातील सर्वच अधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवून परिस्थितीजन्य योग्य निर्णय घेतला असल्याने पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.