Elorda Cup 2024 : विद्यमान विश्वविजेत्या निखत झरीन आणि मीनाक्षी यांनी आपापल्या वजन गटात सुवर्णपदकाची कमाई केली. शनिवारी, भारतीय संघाने एलोर्डा चषक बॉक्सिंगमधील आपल्या मोहिमेचा शेवट 12 पदकांसह केला. निखत आणि मीनाक्षीच्या सुवर्णपदकांव्यतिरिक्त, भारतीय बॉक्सर्सनी दोन रौप्य आणि आठ कांस्यपदके जिंकून मागील हंगामापेक्षा खूपच चांगली कामगिरी केली. गेल्या मोसमात भारतीय बॉक्सर्सनी पाच पदके जिंकली होती.
निखतने (52 किलो) प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आणि कझाकस्तानच्या जाझिरा उराकबायेवा हिचा 5-0 असा पराभव करून तिच्या प्रभावी कारकिर्दीत आणखी एक सुवर्णपदक जोडले. दुसरीकडे याच स्पर्धेत मीनाक्षीने महिलांच्या 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या रहमोनोव्हा सैदाहोन हिचा 4-1 असा पराभव करून भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
अनामिका (50 किलो) आणि मनीषा (60 किलो) यांना अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यांच्या मोहिमेचा शेवट रौप्य पदकांसह झाला. अनामिकाने सध्याची विश्व आणि आशियाई चॅम्पियन चीनच्या ‘वू यू’ हिला कडवी टक्कर दिली पण तिला 1-4 ने पराभवाचा सामना करावा लागला. मनीषाला कझाकिस्तानच्या व्हिक्टोरिया ग्राफिवा हिच्याकडून 0-5 असा पराभव स्वीकारावा लागला.
पुरुष गटात एकही भारतीय बॉक्सर अंतिम फेरीतही पोहोचू शकला नाही. पॅरिससाठीही अद्याप एकही पुरुष बॉक्सर पात्र ठरू शकलेला नाही. त्यांना पुढील आठवड्यापासून बँकॉकमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तिकीट मिळविण्याची ही शेवटची संधी असेल.
कांस्यपदक विजेते (पुरुष) : याइफाबा सिंह सोइबम (48 किलो), अभिषेक यादव (67 किलो), विशाल (86 किलो) आणि गौरव चौहान (92 किलो पेक्षा अधिक). महिला : सोनू (63 किलो), मंजू बम्बोरिया (66 किलो), शलाखा सिंह संसनवाल (70 किलो) आणि मोनिका (81 किलोपेक्षा जास्त).