- व्यापाऱ्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचे दिवाळे
पिंपरी – दसऱ्याला झेंडूच्या फुलांच्या दराने यंदा आतापर्यंतची विक्रमी उलाढाल केली. अल्प खरेदी आणि विक्रीत कोट्यवधींची उलाढाल यंदा झाली. दर तासा-तासाला वाढणाऱ्या दरांनी झेंडूचा भाव एक किलोला 400 ते 500 रुपयांवर नेऊन पोहचविला. आतापर्यंतचा झेंडूला उच्चांकी भाव दोन वर्षांपूर्वी 250 रुपये मिळाला होता. या विक्रीचा विक्रम मोडीत काढत यंदा प्रतिकिलो 400 रुपये भाव मिळविला आहे. कमी आवक आणि अधिक मागणीच्या जोरावर व्यापाऱ्यांनी दसऱ्यालाच दिवाळी साजरी करुन घेतली. परंतु पावसाच्या फटक्यामुळे खूपच कमी उत्पादन झालेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले.
दसऱ्याच्या एक दिवस पूर्वी झेंडूचा दर 150 रुपये किलो होता. दसऱ्याच्या दिवशी सकाळी हा दर दोनशे रुपये किलो झाला. त्यानंतर बाजारात झेंडूची उपलब्धता कमी असल्याचा अंदाज येताच झेंडूचे दर वाढू लागले. दुपारी बारा वाजेपर्यंत झेंडूच्या दराने 400 ते 500 रुपयांपर्यंत उडी घेतली. दरवर्षी सकाळी अकरा-बारा वाजेपर्यंत झेंडूची खरेदी आटोपली जाते आणि दर घसरायला लागतात. परंतु यावर्षी मात्र सायंकाळी उशिरापर्यंत नागरिक स्वस्त झेंडूच्या शोधात फिरत होते, तसा-तसा झेंडूचा दर वाढत होता.
जास्त नफा कमविण्याची शक्कल
अनेक व्यापाऱ्यांनी झेंडूची फुले विकण्याऐवजी हार तयार करुन अजून जास्त नफा कमविण्याची शक्कल लढविली. चार-पाच फुलांचा हार देखील पन्नास रुपयांपेक्षा अधिक महाग होता. चारचाकी वाहनांना घातले जाणारे हार तर थेट 250 ते 2000 रुपयांना विकले जाऊ लागले. कमी मालात जास्तीत जास्त नफा कमविण्याची ही शक्कल कामी आली आणि फूल विक्रेत्यांनी चारशे ते पाचशे टक्क्यांनी नफा कमविला. एरव्ही दहा रुपयांना विकला जाणार लहान हार 50 रुपयांना उपलब्ध होता. तर हाराच्या आकारमानानुसार अगदी दोन हजार रुपयांपर्यंत झेंडूच्या हारांची विक्री झाली.
शेतकऱ्यांचे मात्र हाल
शहरातील चऱ्होली, मोशी, डुडुळगाव या भागातून तसेच मावळ येथे मोठ्या प्रमाणात फूल उत्पादक शेतकरी आहेत. करोनामुळे सहा महिने पिंपरीतील फुलबाजार बंद होता. यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नवरात्रोत्सवात फुलबाजाराला काहीशी उभारी मिळाली. परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नव्हता. पंधरा दिवसांपूर्वी झेंडूला दहा रुपये प्रतिकिलोचा निचांकी दर मिळाला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी शेतकऱ्यांकडून व्यापारी वर्गाने 20 रुपये किलोने झेंडू विकत घेतला. दसऱ्याच्या दिवशी झेंडू 400 रुपये किलो विकला गेला असला तरी शेतकऱ्याला मात्र किलो 80 ते 100 रुपयेच मिळाले. परतीच्या पावसाचा फटका बसल्याने झेंडूच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. तसेच पावसांमुळे फुलांच्या पाकळ्या तुटल्या होत्या. फुले चांगली नसल्याचे सांगून व्यापाऱ्यांनी अजून दर उतरविला. 80 ते 100 रुपये दर मिळूनही परतीच्या पावसामुळे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही जेमतेम निघू शकला.
पहिल्यांदाच दिसले असे चित्र
करोनामुळे आर्थिक स्थिती बिघडलेल्या नागरिकांसाठी देखील झेंडुचे हे दर परवडण्यासारखे नव्हते. दसरा, दिवाळी आणि गुढी पाडव्याला दोन ते तीन किलो फुले घेणाऱ्या नागरिकांनी यंदा पाव किलो ते अर्धा किलो फुलांवरच सण साजरा केला. फुलांच्या दरांमुळे अनेक दारांवर सात ते आठ फुलांची विरळ तोरणे दिसत होती. तर अनेक वाहनांना यंदा हारच नव्हते, केवळ पूजा करुन एखादे फूल ठेवत अनेक गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांनी हा सण साजरा केला. गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच असे चित्र पहावयास मिळाले. एरव्ही दुपारी बारा वाजेपर्यंत पूजा उरकल्या जायच्या. परंतु यंदा स्वस्त फुले शोधण्यातच दुपार झाली. तसेच अनेक उपनगरांमध्ये एक-दोन ठिकाणीच फुले विक्रीसाठी उपलब्ध होती. पिंपरीचा बाजारातही सायंकाळपर्यंत फुले विकली जात होती.
व्यापाऱ्यांनी फुल उत्पादकांकडून 80 ते 90 रुपये प्रतिकिलो दराने विकत घेतली. मात्र, बाजारात फुले कमी प्रमाणात असल्याने, त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी भाववाढ करत घेतला. त्यामुळे या दरवाढीचा फायदा फूल उत्पादकांना झाला नाही.
– बाळासाहेब धायरकर,
फूल उत्पादक, डुडुळगाव