शिक्रापूर -शिक्रापूर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने गावामध्ये खासगी वाहनांना तसेच नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. पुणे नगर महामार्गावरून येणाऱ्या सर्व वाहनांवर औषध फवारणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील एका डॉक्टरला करोनाची लागण झाल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली, मात्र शिक्रापूर परिसरातील 144 व्यक्ती व नागरिक होम क्वारंटाइन करण्यात आले असताना गावामध्ये स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यास सुरवात करण्यात आली आहे.
गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. गावामध्ये आरोग्य सेवक व मदतनीस यांच्यामार्फत सर्वे सुरू करण्यात आला आहे. ग्रामपंचायतच्या वतीने पुरेपूर काळजी घेण्यात येत असून गावामध्ये सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, असे ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी सांगितले.