नवी दिल्ली – करोना संसर्गितांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने बुधवारी सक्रिय बाधितांनी नऊ लाख 50 हजाराचा आकडा ओलांडला. तर 30 डिसेंबरला देशातील पॉझिटिव्हिटी दर 1.1 टक्के होता तो अवघ्या 12 दिवसांत 11.05 टक्क्यांवर पोहोचला.
बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत एक लाख 94 हजार 720 संसर्गितांची नोंद झाली. तर 442 जणांचे मृत्यू झाले. सक्रीय बाधितांची संख्या नऊ लाख 55 हजार 319 वर पोहोचली. ही वाढ 211 दिवसातील सर्वोच्च आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
दोन कोटी किशोरांचे लसीकरण
करोना प्रोतबंधक लसीकरण 15 ते 18 वयोगटात दोन कोटीपेक्षा अधिक किशोरवयीनांचे झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देशातील तरूणांनी जबबादारीचे भान दाखवले. कमी काळात त्यांनी व्यापक प्रतिसाद दिला, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
संसर्गितांचा आलेख उतरता
मुंबईत करोना संसर्गितांचा आलेख उतरता आहे. देशाच्या राजधानीतही असाच कल आहे. रुग्णालयात दाखल असणाऱ्यांचा कल पाहता आता आपण शिखरावर आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांत रुग्णसंख्येत घट दिसू लागेल, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री डॉ. सत्येंद्र जैन यांनी सांगितले.
उतार सुरू झाला म्हणणे घाईचे
मुंबईत सात जानेवारीपासून संसर्गितांची संख्या ओसरत आहे. मंगळवारी 11 हजार 647 संसर्गित नोंदवण्यात आले. मात्र आलेख उतार सुरू झाल्याचे आताच म्हणणे थोडे घाईचे ठरेल, असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.