पुणे ( प्रभात वृत्तसेवा ) – विसर्जन मिरवणुक किती वेळेत संपवायची याचे कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे यंदाची मिरवणुक कमी वेळेत संपणार की लांबणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये सर्वात कमी वेळेत विसर्जन मिरवणुक पार पडली. मात्र, यंदा रेकॉर्डब्रेक मिरवणूक होईल आणि आतापर्यंतचे वेळेचे सर्व रेकॉर्ड मोडले जातील असेही बोलले जाऊ लागले आहे.
पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता उद्या होत आहे. आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या विसर्जन मिरवणूका यंदा दोन वर्षांच्या केरोनामुक्तीमुळे धुमधडाक्यात होत आहेत. त्यामुळे गणेश भक्तांचा आनंद द्विगणीक असल्याचे पाहिला मिळत आहे. सरकारने देखील यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सांगितले. त्यानंतर पुणे पोलिसांनी देखील नियम शिथील केले. दरवर्षी प्रमुख मंडळांसमोर तीन ढोल-ताशा पथक लावण्याचा नियम यंदा पोलिसांनी न ठेवल्याने परिणामी मिरवणूका लांबणार असल्याचे दिसत आहे. दोन वर्षांपुर्वी म्हणजेच 2019 मध्ये झालेली विसर्जन मिरवणूक अत्यंत कमी वेळात 24 तासात पुर्ण झाली होती. त्याअधी 26 तास लागला. यावेळी ढोल-ताशा पथकावर मर्यादा आणि मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी मंडळांना पुढे नेत मिरवणुक कमी वेळेत संपविण्यासाठी पोलिसांचा खटाटोप चालत असे.
दहा वर्षांचे विसर्जन मिरवणूकीच्या वेळा…
2013- 27 तास 25 मिनिटे
2014- 29 तास 12 मिनिटे
2015- 28 तास 38 मिनिटे
2016- 28 तास 30 मिनिटे
2017- 28 तास 05 मिनिटे
2018- 26 तास 36 मिनिटे
2019- 24 तास
यंदाच्या विसर्जनाला दुप्पट गर्दी होण्याची शक्यता
विसर्जन मिरवणूकीत यंदा दुप्पट गर्दी होण्याची शक्यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे. दरवर्षी चार ते साडे चार लाख गणेशभक्त विसर्जन मिरवणूकीत सहभागी होतात. यंदा मात्र, ही संख्या दुप्पट होईल. त्यानूसार, पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे.गर्दीला नियत्रंण करण्यासोबतच छेडछाड तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांचा खडा पहारा असणार आहे.
तरी यंदाची गर्दी पाहता सतर्क रहावे लागणार आहे. गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्यास ढकला-ढकली तसेच चेंगरा-चेंगरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वृद्ध तसेच लहान मुलांची काळजी घ्यावी लागणार आहे. नागरिकांनी कोणतीही अडचळ आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.