पुणे – करोनाच्या धोक्यात ठप्पझालेले क्रीडा क्षेत्र आता पूर्वपदावर येत आहे. केंद्र सरकारने सर्व स्पर्धा तसेच सरावाला मान्यता दिली असून राष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रकही जाहीर होत असताना राज्य सरकारने मानाच्यामहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेलाही परवानगी देत राज्यातील कुस्तीपटूंना दिलासा दिला आहे.
महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा राज्यातील सर्वात महत्वाची मानली जाते. करोनामुळे ही स्पर्धा होणार की नाही याची चिंता सर्वांना वाटत होती. मात्र, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना सातत्याने ही स्पर्धा सुरू होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
दोनच दिवसांपूर्वी शासकीय प्रतिनिधींबरोबर झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी दरम्यानही बाळासाहेब लांडगे यांनी आपली बाजू भक्कम पणे मांडली आणि राज्य शासनाने त्यांना आज लेखी पत्रकाद्वारे ही स्पर्धा घेण्यास परवानगी दिली.
सर्व शासकीय बंधनानुसार ही स्पर्धा घेण्यात यावी अशी अट त्यांना टाकण्यात आली आहे. आता कुस्तीगीर परिषदेची स्पर्धा समिती स्पर्धेचा कालावधी आणि केंद्र निश्चित करेल, असे त्यांनी सांगितले.