नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी (11 जानेवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. करोनावरील लसींची उपलब्धता लवकरच होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून घेतल्या जाणाऱ्या त्या व्हर्च्युअल बैठकीचे महत्व वाढले आहे.
करोना संकट उद्भवल्यानंतरची देशातील सध्याची स्थिती आणि लसीकरण मोहीम या मुद्द्यांवर प्रामुख्याने मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील, असे समजते. देशात करोना संकट दाखल झाल्यानंतर मोदी यांनी याआधी अनेकदा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
मात्र, देशात दोन लसींच्या मर्यादित आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांच्यात प्रथमच चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत मोदी लसीकरणाच्या प्रारंभाची तारीख जाहीर करतील, अशा अटकळीही बांधल्या जाऊ लागल्या आहेत.