लांबलेल्या पावसाचा वन्यप्राण्यांना दिलासा

कडबनवाडी येथील चिंकारा अभयारण्यात मुबलक प्रमाणात पाणी जमा

पुणे – जिल्ह्यात झालेल्या अतिरिक्‍त पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नेहमीच पणीटंचाईने ग्रस्त असलेल्या इंदापूर तालुक्‍यातही पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. परिणामी तालुक्‍यातील कडबनवाडी येथील चिंकारा अभयारण्यातही मुबलक प्रमाणात पाणी आणि गवत उपलब्ध झाले असून, अभयारण्यातील सर्वच प्राण्यांना यामुळे दिलासा मिळाला असल्याने वनविभागाकडून समाधान व्यक्‍त करण्यात आले आहे.

पर्जन्यछायेपासून परावृत्त असलेला प्रदेश म्हणून इंदापूर तालुक्‍याची ओळख आहे. त्यामुळेच याठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो. परिणामी हिवाळा संपण्यापूर्वीच या प्रदेशात भीषण पाणीटंचाई निर्माण होते. ज्याठिकाणी नागरिकांनाच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही, अशा प्रदेशात वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, ही वनविभागासमोर कायमच आव्हान राहते. पावसाचे पाणी दीर्घकाळासाठी साठवता यावे, यासाठी वनविभागाकडून या प्रदेशात विविध जलसंधारण प्रकल्प राबविले आहे. यामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करणे, बांधांची निर्मिती करणे, नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरूज्जीवन करणे यासारखे उपक्रम राबविण्यात आले आहे.

मात्र, मुळातच कमी पाऊस पडत असल्याने या जलस्रोतांमध्ये पाणीसाठाच होत नाही. परिणामी अभयारण्यातील चिंकारांना अन्न आणि पाण्यासाठी तरफडावे लागते. यंदा मात्र लांबलेल्या पावसाने तालुक्‍यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळेच अभयारण्य परिसरातील जलस्रोतही पाण्याने भरले असून, गवतही वाढले आहे. त्यामुळे यंदा अभयारण्य परिसरात चिंकारासाठी मुबलक प्रमाणात अन्न-पाणी उपलब्ध आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी यांनी सांगितले.

“यंदा तालुक्‍यात झालेल्या पावसामुळे अभयारण्य परिसरात पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे परिसरातील स्थिती समाधानकारक आहे. मात्र, हे पाणी पुढच्या पावसापर्यंत पुरेल याची शक्‍यता कमी आहे. मात्र, वनविभागाकडून त्यासाठी योग्य खबरदारी घेतली जात असून, पाणीसाठा कमी झाल्याचे निदर्शनास येताच, या परिसरातील पाणवठ्यात टॅंकरने पाण्याचा पुरवठा केला जाईल.’
– राहुल काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, इंदापूर वनविभाग

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.