साडेअकरा हजार गावांची पाणीटंचाईतून मुक्‍तता

समाधानकारक पावसामुळे यंदा भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ


भूजल विभागाच्या अहवालातून माहिती समोर


पुणे जिल्ह्यातही आशादायी चित्र

पुणे – यावर्षी राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झालेला आहे. राज्यातील बहुतेक तालुक्‍यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. त्यामुळे यंदा राज्यातील बहुतेक भागांमध्ये दिलासादायक चित्र आहे.

मागील वर्षी भूजल विभागाने राज्यात 11 हजार 487 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार असल्याची शक्‍यता वर्तविली होती. यावर्षीचा विचार करता राज्यातील 14 तालुक्‍यांतील 359 गावांत जानेवारीपासून तसेच 330 गावांत एप्रिलपासून अशी एकूण 689 गावांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात यंदा आशादायी चित्र असून जिल्ह्यात एकाही गावामध्ये पाणी टंचाई जाणवणार नसल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून वर्तविण्यात आले आहे. दरम्यान, अद्यापही राज्यात पाऊस सुरू असल्याने डिसेंबर महिन्यातील पाण्याची पातळी नोंद घेऊन जानेवारीच्या अहवालात चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही भूजल विभागाकडून अहवालात नमूद केले आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालयाकडून 2019-20 या वर्षाचा संभाव्य पाणी टंचाई अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली. संभाव्य पाणीटंचाईबाबतचा अंदाज सप्टेंबर अखेरील पर्यजन्यमान व सप्टेंबर अखेर ते ऑक्‍टोंबरमधील पहिला आठवडा यांचा तुलनात्मक अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. मागील वर्षी पुणे जिल्ह्यात 449 गावांमध्ये पाणी टंचाई जाणवणार असल्याचे भूजल विभागाकडून सांगण्यात आले होते. यंदा मात्र पुणे जिल्ह्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे पाणी टंचाई होणार नसल्याची माहिती भूजल विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील गाव पातळीवरील भूजल पातळीचा अभ्यास करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत राज्यातील 32 हजार 769 गावांमध्ये निरीक्षन विहिरींचे जाळे विस्तारण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत या निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळीचा अभ्यास करून पाणी टंचाई अहवाल तयार केला आहे.

9 हजार 355 गावांमध्ये 1 मीटपर्यंत भूजल पातळी
यंदा भूजल पातळीतही वाढ झाली असून सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यातील 9 हजार 355 गावांमध्ये भूजल पातळी 1 मीटपर्यंत आहे. मागील वर्षी गावांची संख्या 13 हजार 984 इतकी होती. तर 1 ते 2 मीटरपर्यंत पाणीपातळी असलेल्या गावांची संख्या राज्यात 3 हजार 281 इतकी आहे. 2 ते 3 मीटरपर्यंत पाणीपातळी असलेल्या गावांची संख्या 1 हजार 910 इतकी आहे. तर 3 मीटरपेक्षा पाणीपातळी असलेल्या गावांची संख्या 4 हजार 164 इतकी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 822 गावांमधील भूजल पातळी ही 3 मीटरपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)