पिंपरी -पोलीस ठाण्यात नागरिकांना कशी वागणूक मिळते याबाबत “रियालिटी चेक’ करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी वेशांतर केले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चेहऱ्यावर दाट झुबकेदार दाढी, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग लावून त्यावर पांढरी गोल टोपी परिधान केली. सलवार कुर्ता आणि मास्क लावून हा वेश परिधान करून आयुक्त बनले “जमालखान कमालखान पठाण’. तर सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे बनल्या त्यांच्या बेगम. वेशांतर केलेले हे पठाण दाम्पत्य बुधवारी (दि. 5) रात्री पिंपरी चिंचवड शहरातील
रस्त्यावर उतरले.
हे आमचे काम नाही – पिंपरी पोलीस
सुरुवातीला आयुक्तांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. “आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल आठ हजार रुपये सांगितले’, अशी तक्रार त्यांनी केली.
नियंत्रण कक्षातून ही माहिती पिंपरी पोलिसांना देण्यात आली. पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी जाण्याऐवजी तक्रारदार पठाण यांनाच पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. मध्यरात्री सव्वाबारा वाजता पठाण दाम्पत्य पिंपरी पोलीस ठाण्यात खासगी टॅक्सी करून गेले. “रुग्णवाहिकावाला आम्हाला लूटतोय, आमची तक्रार दाखल करून घ्या’, अशी मागणी पठाण दाम्पत्याने केली. त्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात असलेल्या पोलिसांनी पठाण यांना “हे आमचे काम नाही’ असे म्हणून झिडकारले. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस अशी वागणूक देत असल्याने पठाण झालेले पोलीस आयुक्त संतापले. त्यांनी तात्काळ आपली ओळख दाखवत संबंधित पोलिसांना विचारणा केली.
येथे मिळाली सौजन्यपूर्ण वागणूक
हिंजवडी पोलीस स्टेशन आणि वाकड पोलीस चौकीत त्यांनी “आम्ही रमजानचे उपवास ठेवतो. परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा आम्हाला त्रास होतो. काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली. मला कंबरेत लाथा घातल्या. आमची झटापट झाली त्यात एकाचा मोबाइल माझ्या हातात आला आहे’ अशी तक्रार केली. तिथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी दखल घेऊन कच्ची फिर्याद तयार केली. वरिष्ठांना बोलावून ते येईपर्यंत थांबण्याची विनंती केली. पोलिसांनी दिलेल्या या सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे पोलीस आयुक्तांना जरासे हायसे वाटले. त्यांनी आपली ओळख दाखवून पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
गुन्हेगारांना कसे ओळखणार?
पोलीस आयुक्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. ते जिथे जातात, तिथे त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांची झुंबड उडते. असा सर्वांच्या ओळखीचा चेहरा पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र ओळखता आला नाही. पोलीस आयुक्तांनी वेशांतर करून शहरातील पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावली. मात्र, पोलीस आयुक्तांना न ओळखणारे पोलीस वेशांतर करणाऱ्या गुन्हेगारांना कसे ओळखणार, अशी चर्चा शहरात सुरू आहे.