हैदराबाद – करोनाचा धोका संपुष्टात आला की क्रीडा स्पर्धा सुरु होतील अशी अपेक्षा जगभरातील क्रीडापटू करत आहेत. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने देखील आपण आगामी स्पर्धांसाठी पूर्ण तंदुरुस्त व सज्ज असल्याचे म्हटले आहे.
मार्च महिन्यापासून करोनामुळे जगभरातील स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर, काही स्पर्धा स्थगितही केल्या गेल्या आहेत. ग्रॅण्डस्लॅम टेनिसमधील अत्यंत मानाची विम्बल्डन स्पर्धा तर दुसऱ्या महायुद्धानंतर यंदा प्रथमच रद्द करण्यात आली आहे. सगळीकडे एक नकारात्मकता दिसून येत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सर्व काही सुरळीत होणे गरजेचे आहे. त्यातच एकदा स्पर्धा सुरू झाल्या की वातावरण देखील सकारात्मक होईल, असेही सानियाने म्हटले आहे.
सानियाने आई बनल्यानंतर आहारतज्ज्ञाची मदत घेत आपले वजन कमी केले आहे. तसेच तिने तिच्या फार्महाऊसवरील छोट्या मैदानात टेनिसचा सरावही सुरु केला आहे. स्पर्धा जरी होत नसल्या तरी सराव व तंदुरुस्ती खूप महत्त्वाची असून त्याद्वारेच आगामी मोसमात होत असलेल्या स्पर्धांसाठी सक्षम होता येणार आहे. जगभरातील विविध स्पर्धा सध्या जरी लांबणीवर टाकण्यात आल्या असल्या तरी जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल त्यावेळी सातत्याने स्पर्धा तसेच सामने खेळावे लागतील. त्यामुळे सध्या मी सराव, तंदुुरुस्ती तसेच व्यायामावर भर देत आहे, असेही सानियाने सांगितले.