भाजपसह बहुतेक पक्षांच्या याद्या जाहीर होणार ते दोन्ही राष्ट्रवादी पालिका निवडणूक एकत्र लढणारपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

१ . भाजपसह बहुतेक पक्षांच्या यादी आज जाहीर होणार
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपसह इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली जाणार असून, उमेदवारांना कागदपत्रे तयार ठेवण्याचा निरोप देण्यात आलाय. काहीजणांचे अर्ज पक्षाने आधीच भरून ठेवलेत.अर्ज दाखल करण्याची मुदत आता दोनच दिवस राहिली असून, इच्छुकांची उत्कंठा शिगेलाही पोहोचलीय. अजून एकाही प्रमुख पक्षांची यादी अद्याप जाहीर झाली नाही. इच्छुक नाराज होऊ नयेत आणि दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत यासाठी ही खबरदारी प्रत्येक पक्षाने घेतल्याचं दिसतंय.असं असलं तरी अनेक उमेदवारांना अर्ज तयार ठेवण्याचे निरोप पक्षातून गेलेत. त्यामुळे तिकिट मिळालेल्या उमेदवारांनी ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ ही भूमिका घेतलीय. भाजप, काॅंग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनासह सगळे पक्ष आजच आपली यादी जाहीर करतील. त्यामुळं आजचा दिवस हा अर्ज दाखल करण्याच्या धामधुमीत जाणार हे स्पष्ट आहे.
२. भाजप-शिवसेना जागावाटपाचा तिढा कायम
अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस बाकी असले तरी पुण्यात पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. रविवारी होणारा निर्णय आजपर्यंत होऊ शकला नाही. जागावाटपचा तिढा आणि युती होणार की नाही हेही आज स्पष्ट होईल मात्र, यामुळं पक्षात येणारे आणि बाहेर जाणाऱ्यांची द्विधा स्थिती झाली आहे. युती जाहीर झाल्यावर दोन्ही पक्षांची पहिली बैठक १८ डिसेंबरला झाली. त्याला दहा दिवस झाले तरी जागावाटप मार्गी लागलेले नाही. भाजपने देऊ केलेल्या १५ जागा शिवसेनेला मान्य नसून ते २५ जागांवर आग्रही आहेत. शनिवारी शिवसेनेची बैठक होऊन अंतिम यादी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांना पाठवल्यानंतर रविवारी निर्णय होईल असे नेत्यांनी स्पष्ट केले. मुंबईत बैठक झाली तरी मार्ग निघाला नाही. आता या चर्चेत आणखी एका मंत्र्याचा समावेश झाला असून त्यातील निष्कर्ष आज हाती येण्याची चिन्हे आहेत.३. भाजपकडून धंगेकरांची कोंडी!
महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटेलला नाही. हा तिढा जागा वाटप किंवा अथवा कोणी किती जागा लढवायच्या यावर नसून हा तिढा शिवसेनेचे महानगर प्रमुख माजी आमदार रविंद्र धंगेकर असल्याचं समोर आलय.रविंद्र धंगेकर यांनी प्रभाग २४ मध्ये दोन जागांची मागणी केली असून भाजपने या जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महायुतीचे जागा वाटप अद्यापही निश्चित झालेले नाही. शिवसेनेकडे २०१७ मधील केवळ २ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपने त्या जागांच्या टक्केवारीचा हवाला देत शिवसेनेला कमीत कमी जागा देणार असल्याचा दावा करत धंगेकरांना रोखण्याची खेळी भाजपने केलीय. त्यामुळे, आता नाराज धंगेकरांकडून पुन्हा भाजपवर निशाणा साधण्यास सुरूवात झालीय.
४. पुण्यात संभ्रम मात्र पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
दिवसभराच्या बऱ्याच घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप) यांच्याशी फारकत झाल्याचे जाहीर केले. याला जेमतेम दीड दिवसही उलटला नसताना आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. मविआच्या रविवारी आयोजित बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं निश्चित झालं. दरम्यान पिंपरी चिंचवड दोन्हीही राष्ट्रवादी पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार आहेत. दोन्ही पक्ष एकत्रित येऊन या शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची घोषणा केली. पिंपरी चिंचवड शहरातील तळवडेतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे घोषित केले.
५. भाजपा ‘लाडक्या बहिणींच्या’ पाठीशी राहणार
आपल्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे तरुण वर्ग आणि माता-भगिनींमध्ये देवाभाऊ म्हणून लोकप्रिय असलेले देवेंद्र फडणवीस जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलंय. केवळ ही योजनाच नव्हे तर महिला सबलीकरणाच्या केंद्र, राज्याच्या सर्व योजना सर्वशक्तीनिशी राबवल्या जातील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही पक्षानं म्हटलंय. विधानसभा निवडणुकीत विरोधकांना भुईसपाट करण्यात या योजनेचा लक्षणीय वाटा राहिला. त्यामुळे बिथरलेले विरोधी पक्ष निवडणुकीच्या तोंडावर ही योजना बंद होणार असल्याचा अपप्रचार करतात. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही विरोधी पक्षांनी भाजप सरकार ही योजना बंद करू शकते, असा अपप्रचार करत लाडक्या बहिणींना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. तोच फंडा आताही विरोधी पक्षांनी पुन्हा वापरलाय त्यामुळं भाजपने लाडक्या बहिणांना दिलासा देत ही योजना बंद होणारे नसल्याचा खुलासा केलाय.६. भारतीय जनता पक्षाच्या डिजिटल प्रचार रथाचे उद्घाटन
भारतीय जनता पक्षाच्या डिजिटल प्रचार रथांचे उद्घाटन रविवारी सायंकाळी एरंडवणेच्या शहर कार्यालयासमोर उत्साहात करण्यात आले. ‘पुण्याचा विकास करायचा तर ‘भाजपा’च पाहिजे’ असे घोषवाक्य या प्रचार रथांवर आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदींच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचार रथांचे उद्घाटन करण्यात आले. भाजपच्या झेंड्याच्या रंगाप्रमाणे भगव्या आणि हिरव्या रंगाच्या या आकर्षक प्रचार रथांवर एलईडी स्क्रीन असून दृकश्राव्य माध्यमातून पक्षाने केलेल्या कामांची माहिती दिली जाणार आहे. हे प्रचार रथ शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरुन भाजपाने पुण्यासाठी केलेल्या कामांची माहिती आणि भावी विकासाची दिशा याबाबत प्रचार आणि प्रसार करणार आहेत.
७. मुंबईत भाजपची ‘या’ 9 उमेदवारांची नावं निश्चित
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. पक्षाकडून ९ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. यात युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हेदेखील मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना देखील पक्षाकडून उमेदवारी देण्यात येणारेय. हे सर्व उमेदवार आजच आपला उमेदवारी अर्ज भरतील, सांगण्यात येतंय.भाजपकडून या सर्व उमेदवारांची नावे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 128 जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्या असे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, भाजपकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून ही काळजी घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
८. मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
राज्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 100 उमेदवारांची यादी जाहीर होईल, अशी माहिती आमदार आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी दिली होती. मात्र, पहिल्या यादीत 37 उमेदवारांना संधी देण्यात आली असून नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. नबाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना महापालिकेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे.९. टाटा-एर्नाकुलम एक्सप्रेसला भीषण आग, दोन डबे जळून खाक
आंध्र प्रदेशातील यलमंचिलीत एक मोठा रेल्वे अपघात झालाय. टाटा-एर्नाकुलम एक्सप्रेस ट्रेनच्या B1 आणि M2 डब्यांमध्ये अचानक आग लागली. या आगीत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. तर इतर अनेक प्रवासी थोडक्यात बचावले. रात्री १२ ते १ च्या दरम्यान आग लागली.आगीमुळे ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. परंतु अनेक प्रवाशांना वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या अपघातात रेल्वेचे डबे पूर्णपणे जळून खाक झालेत. आगीची माहिती मिळताच लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवली. रेल्वे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यास सुरुवात केली. दरम्यान,समोर आलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या दृष्टीनं दोन्ही डब्बे रेल्वेपासून वेगळे करण्यात आले असून आग नेमकी कोणत्या कारणामुळं लागली याचा तपास करण्यात येणार आहे.१०. अमेरिकेत टॅरिफ बॉम्बमुळे अनेक कंपन्या दिवाळखोरीत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने या वर्षभरात बराच गोंधळ घातला. टॅरिफमुळं अमेरिकेचा महसूल वाढला असा दावा ट्रम्पकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसतय. अमेरिकेतील कंपन्या दिवाळखोरीत निघत आहेत. 2025 मध्ये दिवाळखोरीत जाणाऱ्या कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलीय. गेल्या 15 वर्षांचा उच्चांक दिवाळखोरीत निघणाऱ्या कंपन्यांच्या संख्येनं गाठलाय. यासाठी ट्रम्प टॅरिफ हे सर्वात मोठं कारण असल्याचं कंपन्या सांगत आहेत. याशिवाय महागाईचा देखील फटका बसतोय. एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते नोव्हेंबरमध्ये 717 कंपन्यांनी चॅप्टर किंवा चॅप्टर 11 नुसार दिवाळखोरीसाठी अर्ज केलाय. 2024 च्या 11 महिन्यांच्या आकडेवारीच्या तुलनेत 2025 मधील आकडेवारी 14 टक्क्यांनी जास्त आहे. तर, 2010 नंतरची सर्वाधिक असल्याचं सांगण्यात येतंय.





