Pune News | ई-गव्हर्नन्समध्ये पुणे महापालिका राज्यात अव्वल!

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात पुणे महापालिकेने राज्यातील सर्व महापालिकांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल हा बहुमान मिळाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत पुणे महापालिकेची निवड करण्यात आली.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी विविध ई-गव्हर्नन्स प्रकल्पांचा अहवाल सादर केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. उपस्थित होते.महापालिकेने मराठी व इंग्रजी भाषेत ३६ मायक्रो-साइट्ससह नवी वेबसाइट विकसित केली असून तिला वर्षाला ६७ लाखांहून अधिक भेटी मिळतात. पीएमसी केअर, रोड मित्र आणि पीएमसी आयएसडब्ल्यूएम यासारखी नागरिक-केंद्रित ॲप्स तसेच ८९ ऑनलाइन सेवा नागरिकांना उपलब्ध आहेत.
गेल्या वर्षभरात १.१५ लाख तक्रारींचे निवारण झाले असून आता संपूर्ण पालिकेचे कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे सुरू आहे.रोड ॲसेट मॅनेजमेंट सिस्टीम, इंटिग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम, केंद्रीय डॅशबोर्ड आणि पीएमसी स्पार्क वॉर रूम यामुळे कामकाजात पारदर्शकता आणि वेग वाढला आहे. तक्रार निवारण, कर वसुली आणि सोशल मीडियावरील अभिप्राय विश्लेषणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचाही महापालिकेचा मानस आहे. या प्रकल्पांमुळे पुणे महापालिका ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये राज्यात अग्रणी ठरली आहे.





