Pimpri : राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमात पिंपरी चिंचवड अव्वल

पिंपरी : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एप्रिल व मे २०२५ च्या आरोग्य कार्यक्रमांच्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. एप्रिल महिन्यात ४५.१८ गुणांसह महापालिकेने पहिला क्रमांक तर मे महिन्यात सर्व बाबींवर अधिक प्रगती करत ४७.७० गुण मिळवून पुन्हा आपले प्रथम स्थान अबाधित ठेवले.
या रँकिंगमध्ये मातृत्व आरोग्य, बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, पीसीपीएनडीटी, आरसीएच पोर्टल, आयडीएसपी, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, रेबीज नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, डेंग्यू व मलेरिया नियंत्रण, असंसर्गजन्य आजार नियंत्रण, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मानांकन, ई-औषधी, मोफत निदान सेवा, आयुष्मान भारत-आरोग्य व आरोग्य कल्याण केंद्रे, एचआयव्हीएस, आशा कार्यक्रम तसेच प्रशासन व वित्तीय व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या निर्देशकांचा समावेश होता.
या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या यशामुळे पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले आहे की, सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळेच आरोग्यसेवेत उत्तम कामगिरी साधता येते.
ही रँकिंग केवळ आकडेवारी नाही तर आपल्या कार्यसंस्कृतीची आणि आरोग्य सेवेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची पावती आहे. नागरिकाभिमुख धोरणे, सातत्यपूर्ण तपासणी, लसीकरण, महिलांचे व बालकांचे आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांवर नियंत्रण यामध्ये आम्ही सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे.
– विजयकुमार खोरटे, अतिरिक्त आयुक्तआरोग्य सेवा पोहोचवताना प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांपासून रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांपर्यंत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. ही राज्यस्तरीय कामगिरी शहरातील प्रत्येकासाठी अभिमानाची आहे. आगामी काळात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपण ही कामगिरी टिकवून ठेवू, असा आम्हाला विश्वास आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी





