CNG Price Hike : रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार! मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर होणार लागू
राज्यात महागाई असतानाच आता मुंबईकरांच्या खिशावर आणखी एक मोठा भार पडणार असून, महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि लगतच्या परिसरात सीएनजीच्या दरात (CNG Price Hike) प्रति किलो 1.50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

CNG Price Hike : राज्यात महागाई असतानाच आता मुंबईकरांच्या खिशावर आणखी एक मोठा भार पडणार असून, महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि लगतच्या परिसरात सीएनजीच्या दरात (CNG Price Hike) प्रति किलो 1.50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दरवाढीनंतर आता मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीचा नवा दर प्रति किलो 91.50 रुपये इतका असणार आहे. हे सुधारित दर 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
या निर्णयाचा थेट फटका रिक्षा, टॅक्सी चालक आणि खासगी सीएनजी वाहनधारकांना बसणार आहे. मुंबई शहरातील सीएनजीच्या या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांसह वाहतूकदारांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता असून, आता रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीची मागणी जोर धरण्याची चिन्हे आहेत. एमजीएलने या दरवाढीमागील कारणे स्पष्ट केला आहेत.
सध्या सुरू असलेल्या पश्चिम आशियातील तणाव आणि संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे (CNG Price Hike) दर भडकले आहेत. देशांतर्गत गॅस वाटपात कपात झाल्यामुळे महागड्या आयात केलेल्या आरएलएनजी गॅसवरील अवलंबित्व वाढले आहे. तसेच एकूण पुरवठ्यात आयात गॅसचा वाटा वाढल्याने महानगर गॅस लिमिटेडच्या खरेदी खर्चात मोठी वाढ झाली आहे. या खर्चाची अंशतः भरपाईसाठी आणि अखंड पुरवठा सुरू ठेवण्यासाठी ही दरवाढ करणे अपरिहार्य ठरल्याचे कंपनीने म्हटले.
पुणे, नाशिक, धुळ्यातही दरवाढ
मुंबईपूर्वी पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातही सीएनजी आणि घरगुती पाईप गॅसच्या किमतीत मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे. या शहरांमध्ये सीएनजीचे (CNG Price Hike) दर प्रति किलो 1.25 रुपयांनी, तर पीएनजीचे दर प्रति घनमीटर 1.50 रुपयांनी वाढले आहेत.
नविन दर खालीलप्रमाणे
राज्यातील प्रमुख शहरांमधील सीएनजी आणि पीएनजीचे दर वेगवेगळे असून, मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रति किलो ९१.५० रुपये तर पीएनजी प्रति घनमीटर ५२.०० रुपये दराने उपलब्ध आहे. पुण्यामध्ये सीएनजीसाठी प्रति किलो ९९.०० रुपये आणि पीएनजीसाठी प्रति घनमीटर ५३.०० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच, नाशिक शहरात सीएनजीचा दर प्रति किलो ९९.७५ रुपये इतका असून पीएनजी प्रति घनमीटर ५१.७५ रुपये दराने मिळत आहे.






