प्रभात वृत्तसेवा औंध – औंध ते गणेशवाडी रस्त्यावरील अरुंद वळण व पुल वाहनधारकांसाठी जीवघेणा व मृत्यूचा सापळा पडला आहे. औंध येथील कोल्हाटी वस्ती नजीकच्या पुलाचे व रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने रुंदीकरण करावे व हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा अशी मागणी केली जात असून मागील दोन दिवसांपूर्वी एका दुचाकी वाहनधारकाचा हकनाक बळी या अरूंद रस्ता व पुलामुळे गेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी,औंध ते गणेशवाडी हा रस्ता पुसेसावळी,कराड, सांगली, कोल्हापूर या मार्गांना जोडणारा अतिशय जवळचा वाहतूक मार्ग बनला आहे. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र औंध कडून गणेशवाडीकडे वळताना कोल्हाटी वस्ती नजीकच्या वळणारील रस्ता व पूल अरूंद आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात घडू लागले आहेत. मागील तीन दिवसांपूर्वी रस्त्यावरील वळणाचा व अरूंद पुलाचा अंदाज न आल्याने एक दुचाकीस्वार पुलावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर या ठिकाणी व परिसरात अनेक छोटे मोठे अपघात मागील काही महिन्यांमध्ये याठिकाणी घडले आहेत. हे रोखण्यासाठी औंध येथील तसेच गणेशवाडी नजीकची अरूंद वळणे काढून टाकावीत. “औंध गणेशवाडी पुसेसावळी प्रचंड वाहतुकीचा मार्ग बनला आहे. मात्र औंध नजीकच्या वळणावरील रस्ता पूल रूंद करावा तसेच या रस्त्याचे विस्तारीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे व नागरिकांना दिलासा द्यावा. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष घालावे.” – माजी उपसरपंच दीपक नलवडे