वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प आणि व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यातील तणाव शिगेला पोचला असून ट्रम्प यांनी मादुरो यांना तात्काळ देश सोडून निघून जाण्यास सांगितले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरहून झालेल्या चर्चेनंतर वाद मिटण्याऐवजी चिघळल्याचेच चित्र दिसायला लागले आहे. देशातून बाहेर जाण्यासाठी मादुरो यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर मादुरो यांनी ट्रम्प यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला असून आपल्याला जगभरातून माफी देण्यात यावी आणि लष्करावर आपले नियंत्रण कायम ठेवू देण्याची मागणी केली आहे. मादुरो यांच्याशी आपली चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पण चर्चेदरम्यानचा तपशील त्यांनी उघड केला नाही. पण अल्पावधीतच व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे ही चर्चा अपयशी झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत ट्रम्प व्हेनेझुएलाच्या ड्रग कार्टेलला लक्ष्य करण्याचा इशारा देत होते. आता त्यांनी प्रथमच व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना हटवण्याची भाषा सुरू केली आहे. वाचायचे असल्यास देश सोडून जावे, असा स्पष्ट धमकीवजा इशारा ट्रम्प यांनी दिला असल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. मादुरो, त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस आणि त्यांच्या मुलाला जर देशाबाहेर जायचे असल्यास जाऊ दिले जाईल, याशिवाय काही वरिष्ठ सहकाऱ्यांनाही जाऊ दिले जाईल, असेही ट्रम्प यांच्या प्रस्तावात म्हटले आहे. भूमध्य समुद्रात अमेरिकेने आपल्या विमानवाहू युद्धनौका तैनात केल्यानंतर ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचे आदेश दिले तेंव्हाच त्यांच्या संभाव्य अल्टिमेटमविषयी चर्चा सुरू झाली होती. ट्रम्प आणि मादुरो यांच्यात १६ नोव्हेंबरला रात्री उशिरा फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी मादुरो यांनी आपल्याला जागतिक माफी मिळावी आणि व्हेनेझुएलाच्या सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडरचे पद आपल्याकडे कायम रहावे, अशा दोन मागण्या केल्या होत्या. त्यांनी देशात निवडणुका घेण्याची तयारीही दाखवली होती. मात्र ट्रम्प यांनी या दोन्ही मागण्या अमान्य केल्या आणि मादुरो यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे आणि देश सोडून जावे, असे सांगितले. “मादुरो यांना स्वतःला वाचवायचे असल्यास त्यांनी देशातून तात्काळ निघून जावे. तुमच्याबरोबर तुमच्या निकटवर्तीयांनाही घेऊन जावे. पण तुम्हाला लगेच देशातून जावेच लागेल.” – डोनाल्ड ट्रम्प (अध्यक्ष, अमेरिका) व्हेनेझुएलाविरोधात कारवाई होणार सुरू – व्हेनेझुएलाविरोधातली अमेरिकेची लष्करी कारवाई लवकरात लवकर सुरू होणार आहे. असे सूचित करताना ट्रम्प यांनी हवाई हद्द बंद केल्यानंतरचा फ्लाईट रडारचा नकाशाही प्रसिद्ध केला. यानंतर जगभरातील प्रमुख विमान कंपन्यांनी पर्यायी मार्गांनी विमान प्रवास सुरू केला आहे. अमेरिकेतील ट्रम्प यांच्या विरोधकांनीही व्हेनेझुएलाविरोधातल्या कारवाईला समर्थन दिले आहे.