Election News : नाशिकमध्ये महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम; भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेची नाराजी

नाशिक – नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये शिदेंसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
नाशिकमध्ये भाजपकडून १२२ पैकी 85, शिवसेनेकडून 45, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 30 जागांची मागणी होत आहे. यामुळेच युतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे.
पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून, इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे जागा मिळाव्यात अशी भाजपची भूमिका आहे, असे भाजप शहराध्यक्षांनी सांगितले.
मात्र, प्रत्यक्षात जागावाटपावर युतीचे घोडे अडकले असून, शिंदेसेनेनंतर आता भाजपकडूनही स्वबळावर 122 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, शिंदेसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी भाजपच्या भूमिकेवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. पण मोठ्या भावाने लहान भावांचे आहे ते काढून घेणे, हा कोणता न्याय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नाशिकमध्ये महायुती व्हावी ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचीही इच्छा आहे. तसेच नाशिककरांचीही हीच अपेक्षा आहे. युती न झाल्यास शिवसेना 122 जागांवर सक्षम उमेदवार देण्यास आम्ही तयार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.





