पुणे : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचं बिगूल वाजल्यानंतर राजकीय पक्षांतराला मोठा वेग आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला, विशेषतः भाजपला जोरदार यश मिळालं. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. इतकंच नव्हे तर भाजपने आपल्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटालाही काही ठिकाणी धक्का दिला होता. आता मात्र महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पक्षांतराची लाट उसळली असून, अनेक इच्छुक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर महाविकास आघाडीतून अनेकांनी महायुतीत प्रवेश केला. यात शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं. याचा सर्वात मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसला आणि ठाकरे गटातून सातत्याने नेते बाहेर पडत आहेत. आता पुण्यातून ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहर उपप्रमुख सुरज लोखंडे हे आज (२६ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये प्रवेश करणार आहेत. सुरज लोखंडे आपल्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाणार असून, त्यांच्यासोबत इतरही काही शिवसैनिकांचा पक्षप्रवेश होणार आहे. कालच (२५ डिसेंबर) माजी नगरसेवक अशोक हरणावळ यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता सुरज लोखंडे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटासाठी हा ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर दोन दिवसांपूर्वी (२४ डिसेंबर) मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली. मात्र युतीच्या घोषणेनंतर अवघ्या ४८ तासांमध्ये मनसेला दोन मोठे धक्के बसले आहेत. याच कालावधीत ठाकरे गटालाही सुरज लोखंडे यांच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात सातत्याने इनकमिंग सुरू आहे. या पक्षप्रवेशांमुळे पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि मनसेच्या युतीला बसलेले सलग धक्के पाहता महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे, तर महायुतीला याचा फायदा होण्याची चिन्हं दिसत आहेत. आगामी काही दिवसांत आणखी काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.