जिल्हा तसेच शहर लोकप्रतिनिधींनी केल्या मागण्या
पुणे – पुण्यासाठी व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, डॅश बोर्डवरील माहिती गतीने उपलब्ध करून द्यावी, सोसायट्यांनी करोना पॉझिटिव्ह रुग्णांना चांगली वागणूक द्यावी, यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे. खासगी रुग्णायालयांच्या शुल्क आकारणीवर नियंत्रण ठेवावे, करोनाच्या रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा, व्हेटिंलेटरची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधीकडून सूचना जाणून घेतल्या.
यावेळी लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाने महापालिकेला अर्थसहाय्य करावे, ससून रुग्णालयात तपासणी क्षमता वाढवावी, कोविड केअर सेंटरमधील भोजनाचा दर्जा चांगला ठेवावा, प्रतिबंधात्मक नियम पाळण्याबाबत जनजागृतीवर भर द्यावा. माहिती, शिक्षण आणि संवाद यावर भर द्यावा. करोना तपासणीसाठी फिरते तपासणी केंद्र सुरू व्हावे, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणे व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
यावेळी जिल्ह्यातील करोना परिस्थिती जाणून घेऊन लोकप्रतिनिधींच्या अडचणी व सूचना मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोविड 19 चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्या दृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. या बैठकीला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, जि. प. च्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार निलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट आदी उपस्थित होते.
पंतप्रधानांना विनंती केली आहे…
व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्कचा पुरवठा 1 सप्टेंबर नंतरही केंद्राकडून करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधान यांना केली असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपापल्या स्तरावर याबाबत विनंती करावी, जेणेकरून राज्याला याचा लाभ होईल.