पुणे: आर.सी.एम गुजराथी प्रशाला संघाने जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेतील 19 वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्यांनी एमईएस बॉईज प्रशालेचा 17-15 असा पराभव केला.
जाधव क्रीडानिकेतन येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात आर.सी.एम संघाने मध्यंतराला 9-8 अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून अथर्व भिलारे (3 मिनिटे व 2 गडी) व तेजस धारणे (2 मिनिटे 50 सेकंद व 1 गडी) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पराभूत संघाच्या सिद्धार्थ काशिद (2 मिनिटे 45 सेकंद व 1 गडी) व ओंकार कदम (2 मिनिटे 10 सेकंद व 3 गडी) यांनी दिलेली लढत अपुरी होती. आर.सी.एम संघास राजीव मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.
उपांत्य फेरीत आर.सी.एम संघाने सरस्वती विद्यामंदिरचा 11-7 असा एक डाव 4 गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या अन्य सामन्यात एमईएस बॉईज प्रशालेने नूतन मराठी विद्यालयावर 10-6 असा एक डाव 4 गुणांनी विजय मिळविला.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत नूतन मराठी विद्यालयाने सरस्वती विद्यामंदिर संघाला 10-6 असे एक डाव 4 गुणांनी हरविले. त्याचे श्रेय अथर्व ढाणे व केतन दिड्डी यांच्या अष्टपैलू खेळास द्यावे लागेल. सरस्वती विद्यामंदिरच्या रोहित भायजे व प्रथम वाडेकर चमकले.