पुसेगाव (सातारा) – राज्य भरातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहापैकी चार जागा जिंकून श्री सेवागिरी रयत संघटनेने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. विरोधी सेवागिरी नागरी संघटना व सेवागिरी जनशक्ती संघटनेचा प्रत्येकी एक विश्वस्त निवडून आला आहे.
तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या बचत सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच जनशक्ती संघटनेचे पॅनेलप्रमुख रणधीरशेठ जाधव, रयतचे पॅनेलप्रमुख संतोष उर्फ बाळासाहेब जाधव ,नागरी संघटनेचे पॅनेलप्रमुख डॉ. सुरेश जाधव हे तिघे आघाडीवर होते. तर चार ते सातव्या क्रमाकापर्यंत रयतचे चार उमेदवार होते. रयत संघटनेचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते संतोष मुगटराव जाधव (२१३९), गौरव रायसिंग जाधव (१८०२), संतोष गुलाबराव वाघ (१७६१), सचिन देशमुख (१७२६ ). जनशक्तीचे डॉ. सुरेश सर्जेराव जाधव( १७६३) तर जनशक्तीचे रणधीर सुभाषराव जाधव (२१७१ ) यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे.
तीन विश्वस्तांना पराभवाचा धक्का
निवडणकीत माजी अध्यक्ष डॉ. जाधव ,रणधीरशेठ हे दोघे पुनश्च विजयी झाले. तर विद्यमान अध्यक्ष मोहनराव जाधव (पाटील), योगेश हणमंतराव देशमुख, प्रताप सुभाष जाधव या तीन जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सहाव्या जागेसाठी चुरस
पाच जागा कमी जास्त फरकाने निवडून आल्या. मात्र सहाव्या जागेसाठी रयत आघाडीचेच अभिजित उर्फ गणेश जाधव व सचिन देशमुख यांच्यामध्ये शेवटच्या तीन फेऱ्यात चांगलीच चुरस झाली. त्यामध्ये सचिन देशमुख यांनी २५ मतांनी निर्णायक विजय मिळवला.
एकट्याबरोबर जनशक्ती
पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत जनशक्तीचे पॅनेल प्रमुख रणधीर जाधव शेवटच्या फेरीपर्यंत पहिल्या पसंतीची मते घेत आले. मात्र, त्यांच्या पॅनेलमधील अंकुशराव पाटील वगळता इतर उमेदवार खूपच पिछाडीवर गेल्याने ‘एकट्या नेत्याबरोबरच जनशकी ? अशी चर्चा आहे.
डॉ. जाधवांना पुण्याई व भावकीची साथ
निवडणूकीत नागरी संघटनेचे दिगग्ज पराभूत असताना पॅनेलप्रमुख डॉ. सुरेश जाधव फरकाने निवडून आले. त्यांना गेली अनेक वर्षे ट्रस्टच्या प्रामाणिक कामाची पोहोच मिळण्याबरोबर भावकीचीही चांगली साथ मिळाल्याची चर्चा आहे.