श्री क्षेत्र देहू – जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा 14 जून रोजी देहूमध्ये पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. याबाबतची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानला मिळाल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली. दरम्यान, याबाबत भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्वीटदेखील केले आहे.
श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना संस्थानने आमंत्रण दिले होते. मोदी यांनी ते स्वीकारले होते. मात्र, दिवस निश्चित नव्हता. आता निश्चित झालेल्या दिवसाची माहिती पंतप्रधान यांच्या कार्यालयातून संस्थानला रविवारी (दि.22) मिळाली आहे.
महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण
इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत.
पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी दि. १४ जून रोजी करणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण !॥ जय जय रामकृष्णहरि ॥ pic.twitter.com/iMLiCNWdPv
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) May 22, 2022
शिळा मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार…
गेले काही वर्षे देहूतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री तुकोबारायांच्या शिळा मंदिराचे लोकवर्गणीतून काम सुरू होते. इंद्रायणी नदीत गाथा बुडविल्यानंतर आनंद डोहाशेजारी ज्या दगडी शिळेवर संत तुकाराम महाराज अनुष्ठानाला बसले, त्याच शिळेचा काही भाग तुकोबारायांच्या पूर्वजांनी उभारलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणला गेला. त्यावर मंदिर उभारण्यात आले. याच मंदिराचा जीर्णोद्धार
करण्यात आला आहे.