पुणे(प्रतिनिधी) – मोक्कातील फरार असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या गुन्हे शाखेने मंगळवारी मुस्क्या आवळल्या आहेत. त्यानंतर आता पोलिसांकडून त्याच्या सोशल मीडियाचा धांडोळा घेतला जात आहे. त्यानुसार बऱ्हाटेच्या पोस्टला लाईक करणे, प्रत्येक व्हिडिओ पाहणे, सातत्याने त्याचे पेैसबुक पेज उघडणाऱ्यांची कुंडली तपासण्यात येत आहे. सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून जणांकडून बऱ्हाटेला सातत्याने फॉलो केले जात होते. त्यानुसार गुन्हे शाखेकडून संबंधितांची माहिती गोळा केली जात आहे. अशी माहिती एका अति वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
नागरिकांची फसवणूक करून त्यांची जमीन बळकाकविणे, धमकी देउन प्रॉपर्टी स्वतःसह टोळीच्या नावावर करून घेणे, धमक्यांना भीक न घालणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याचा इशारा देणे, बदनामी करणे यासह संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी रविंद्र बऱ्हाटे याला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
त्यानंतर आता गुन्हे शाखेकडून बऱ्हाटेचा सोशल मीडिया हॅंडल करणारे लोक, छुप्या पद्धतीने फोनवर संपर्क साधणारे, त्याशिवाय त्याने फेसबुकवर अपलोड केलेले व्हिडिओ वारंवार पाहून लाईक करणाऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यांच्यावर वॉच ठेउन कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
सॉफ्ट कॉर्नर दाखवणारेही रडारवर…
बऱ्हाटे संदर्भात काही जण सॉफ्ट कॉर्नर दाखवत आहेत. त्याच्या कुटूंबाला अटक करुन पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकत हजर होण्यास भाग पाडल्याचा प्रसार करत आहेत. त्याचे चाहते हा प्रकार नेमका कोणत्या उद्देशाने करत आहेत. त्यांचाही त्याच्या गुन्हयांमध्ये किंवा व्यवहारात काही हात गुंतला आहे का? याचीही चाचपणी करण्यात येत आहे.