शेवगावमध्ये दिव्यांगांना शिधापत्रिकांचे वाटप

57 अंत्योदय, 129 जणांना प्राधान्य शिधापत्रिका प्रदान
दिव्यांग संघटनेने केलेल्या पाठपुराव्यास यश

शेवगाव – तालुक्‍यातील दिव्यांगांना प्रशासनाचे सहकार्य आणि दिव्यांग संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या अनेक योजना मार्गी लागल्या आहेत. आज अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत समावेश केलेल्या तालुक्‍यातील 57 दिव्यांगांना अंत्योदय तर 129 दिव्यांगांना प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकांचे (रेशन कार्डचे) वाटप करण्यात आले. शिधापत्रिका स्वीकारताना परिस्थितीने गांजल्याने चिंताग्रस्त झालेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा तराळल्या.

तालुक्‍यात जवळपास तीन हजार दिव्यांग असून त्यातील कागदपत्रांची पूर्तता केलेल्या 191 दिव्यांगांचे अर्ज तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी जातीने लक्ष घालून मंजूर केले आहेत. पैकी 57 दिव्यांगांना अंत्योदयाच्या शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत. त्यांना आता दोन रुपये किलो दराने 19 किलो गहू तर तीन रुपये किलो दराने 16 किलो तांदूळ असे 35 किलो धान्य मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेत समावेश झालेल्या 72 दिव्यांग कार्डधारकांना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलोप्रमाणे धान्य मिळणार आहे.

तसेच 75 ते 80 टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांगांना आता संजय गांधी योजनेत 800 रुपये तर 80 टक्के पेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांगांना संजय गांधी योजनेत 1000 रुपये दरमहा मिळणार आहेत. त्याचीही कार्यवाही झाली असून या लाभार्थ्यांना जानेवारी 2019 पासूनचा फरकही मिळणार आहे. आज तहसील कार्यालयाच्या पोर्चमध्ये या शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत, संदीप चिंतामणी, शिवकन्या नाटकर, जनशक्ती दिव्यांग विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष चॉंद शेख, संभाजी गुठे, नवनाथ औटी, संदीप चेडे, भागवत दहिफळे, सयाजी रंधवे,खलील शेख, शिवाजी आहेर, भरत साळुंके, नंदकिशोर चिंतामणी, मनोहर मराठे, हिरामन लहासे, भाऊसाहेब गव्हाणे, बंडू गमे, ऋषि जाधव, आप्पासाहेब खंडागळे, अरुण दुसाने,सुवर्णा देशमुख, मंदा पवार, सखू मिसाळ, वंदना तुजारे, मीरा औटी, मीना बटुळे, फरीदा शेख, मंगल शिंदे, कांता चित्ते, हिरा मिसाळ आदि दिव्यांग बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)