‘आकाश’ वर्षभरात लष्करात दाखल होणार

डॉ. जी. सतीश रेड्डी : सक्षम तंत्रज्ञानयुक्‍त क्षेपणास्त्राची निर्मिती सुरू

पुणे – जमीनीहून हवेत मारा करणाऱ्या “आकाश’ या क्षेपणास्त्राची चाचणी ओडीसामध्ये संरक्षण विकास संशोधन संस्थेने (डीआरडीओ) नुकतीच घेतली. सक्षम तंत्रज्ञानयुक्‍त “आकाश’ची निर्मिती सुरू असून, येत्या वर्षभरामध्ये ते लष्करामध्ये दाखल होणार आहे, अशी माहिती डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी दिली. “डीआयएटी’च्या पदवीप्रदान समारंभानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी “डीआयएटी’चे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायणन उपस्थित होते.

“आकाश’ची मारकक्षमता 18 हजार मीटरच्या अल्टीट्यूटवर 25 किलोमीटरपर्यंत आहे. “आकाश’ या अद्ययावत क्षेपणास्त्राची निर्मिती सुरू असून येत्या वर्षभरामध्ये ते लष्कराकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

संरक्षण क्षेत्रामध्ये नवे स्टार्टअप्स सुरू होत आहेत. याचे एक क्‍लस्टर निर्माण करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार 130 शैक्षणिक संस्थांबरोबर याबाबत चर्चा करून करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून होणाऱ्या संशोधनामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादनाची निर्मिती व्हावी, यासाठी आढावा घेण्यात येत आहे. “डीआयएटी’ने बदलत्या तंत्रज्ञानाला अनुसरून नवे अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना “डीआरडीओ’ने दिल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.