मुंबई – महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-2016 अन्वये विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आणि शैक्षणिक औद्योगिक कार्यक्षेत्रातील जागतिक प्रवाहांचा सखोल अनुभव आणि ख्यातनाम उद्योगपती सल्लागार परिषदेचा अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करावयाची तरतूद असल्याने राज्यपाल यांनी रतन टाटा यांचे नामनिर्देशन केले आहे.
तर संशोधन व विकास विषयक धोरणे व कृतियोजना यासंबंधात कार्यवाही करणाऱ्या राष्ट्रीय आणि जागतिक संस्थामधील कार्याचा अनुभव असलेले ख्यातनाम शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. तर उर्वरित दोन सदस्यांचे नामनिर्देशनही लवकरच करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू हे पदसिद्ध सदस्य म्हणून सल्लागार समितीचे काम पाहणार आहेत.
विशेष म्हणजे उपायात्मक यथार्थदर्शी नियोजनासंबंधी विद्यापीठाला सल्ला देऊन विद्यापीठाच्या वृद्धीकरीता महत्वाचे असे विशेष काम हाती घेण्याचा पूर्ण अधिकार अध्यक्षास असल्यामुळे सल्लागार परिषदेवर अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्या नामनिर्देशनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.