दोघांचे समान सदस्य; निष्ठावंतांना वाटाण्याच्या अक्षता; राष्ट्रवादीकडून महिलांना संधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदांचा तिढा अखेर सुटला असून सत्ताधारी भाजपच्या सहा जागांवर दोन्ही आमदारांच्या प्रत्येकी तीन-तीन समर्थक वर्णी लावण्यात आली आहे. सदस्यांच्या नावाची घोषणा बुधवारी (दि. 26) झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
निष्ठावंतांना कात्रजचा घाट दाखविला तर चंद्रकांत पाटील यांनी सूचविलेली “ती’ दोन नावेही वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तर राष्ट्रवादीकडून अपेक्षित दोन महिला सदस्यांना संधी देण्यात आली आहे.
निवड झालेल्या सदस्यांमध्ये भाजपाचे शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे व भीमाबाई फुगे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून पौर्णिमा सोनवणे व सुलक्षणा धर -शिलवंत यांना संधी देण्यात आली आहे. दोन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या सदस्यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
20 फेब्रुवारी रोजीच ही नियुक्ती होणे अपेक्षित असताना भाजपाचे सदस्य निश्चित न झाल्यामुळे 20 फेब्रुवारी रोजी होणारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर आज झालेल्या सभेत ही नावे महापौर माई ढोरे यांनी नावे जाहीर केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असून या पक्षाचे तब्बल 77 नगरसेवक महापालिकेत आहेत. शहर पातळीवर दोन्ही आमदारांचे दोन गट तर निष्ठावंतांचा एक गट कार्यरत आहे. स्थायी समितीमध्ये 12 सदस्य भाजपाचे, चार राष्ट्रवादीचे तर एक शिवसेनेचा आहे. त्यापैकी भाजपाच्या सहा आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने आजची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 20 फेब्रुवारी रोजीच भाजपाची सहा नावे पाठविली होती.
मात्र त्यातील दोन नावांवर स्थानिक आमदारांचा आक्षेप असल्याचे सांगण्यात येत होते. मंगळवारी मुंबईत दोन्ही आमदार व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अंतिम तोडगा काढण्यात आला. तसेच स्थानिक आमदारांनी सुचविलेली नावेच निश्चित करण्यात आली. त्यानंतर आज ही नावे जाहीर करण्यात आली.
प्रदेशाध्यक्षांनी सुचविलेली नावे डावलली?
20 फेब्रुवारी रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही आमदारांच्या प्रत्येकी दोन समर्थकांची तर दोन नावे इतरांनी सुचविलेली स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे पाठविली होती. यातील पिंपरी मतदारसंघातील एका व भोसरी मतदारसंघातील एका सदस्याच्या नावाला स्थानिक आमदारांचा विरोध होता. त्यामुळे 20 फेब्रुवारी रोजी नावे जाहीर करण्यात आली नाही. यानंतर फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांनी सुचविलेल्या नावावर फुली मारत आमदारांनीच सुचविलेली नावे घेण्याबाबत सांगितले. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सत्तेत तरी चंद्रकांत पाटील यांचा आदेश डावलला गेल्याचेच स्पष्ट झाल्याची चर्चा रंगली आहे.
अन्याय दूर करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादीच्या स्थायी समितीमध्ये कार्यरत असलेल्या दोन महिला सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांच्या जागी राष्ट्रवादीने महिलांनाच संधी दिली आहे. राष्ट्रवादीकडेही इच्छुकांची संख्या मोठी होती मात्र महिलांनाच संधी देण्यात आली. पौर्णिमा सोनवणे यांना संधी देत पक्षाने त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे तर शिलवंत यांना विधानसभेसाठी तिकीट देऊन पुन्हा तिकीट बदलण्यात आले होते. त्याची भरपाई म्हणून त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अंतर्गत कलह वाढणार
भाजपाच्या दोन्ही आमदारांच्या समर्थकांनाच वारंवार संधी मिळत असून इतरांना डावलले जात असल्यामुळे पक्षांतर्गत कलह वाढण्याची शक्यता आहे. भाजपातील 20 ते 25 सदस्यांची स्थानिक पातळीवर ताकद आणि काम असतानाही त्यांना एकाही पदावर गेल्या तीन वर्षांत संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत कलह वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.