मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तब्बल 60 दिवस फोन टॅप करण्यात आला होता तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. यामुळे फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासमोरील वाढण्याची शक्यता आहे.
आथा या प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुलाबा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये रश्मी शुक्ला यांच्या विभागात काम करणाऱ्या एसीपींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
बेकायदेशीर असल्याने आपण नकार देऊनही शुक्ला यांनी आपल्याला फोन टॅपिंग करायला लावल्याचं एसीपीने म्हटलं आहे. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी राज्य गुप्तवार्ता पथकाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीपींनी नोंदविलेल्या जबाबात म्हटलं की, संजय राऊत यांच्यासाठी एस. रहाटे आणि खडसेंसाठी खडासने या नावाचा वापर करून हे दोघंही समाजविघातक कृत्य करत असल्याचं शुक्ला यांनी भासवलं. मात्र फोन टॅपिंग करताना हे रहाटे किंवा खडासने नसून, राऊत आणि खडसे असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर संबंधित सहायक आयुक्तांनी ही बाब शुक्लांना सांगितली पण त्यांनी हे बरोबर असल्याचं म्हटलं.
शिवाय शुक्ला यांनी भारतीय टेलिग्राफिक अॅक्ट कलम 419- अ चा दाखल देत आपल्याला अधिकार असल्याचं दाखवून अधिकाऱ्यांना फोन टॅपिंग करायला सांगितल्याची माहिती देखील एसीपींनी दिली.