पिंपरी – “तू गॅसचा बेकायदेशीर धंदा करतो. तुझी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी समाजात बदनामी करू. तुला प्रकरण मिटवायचे असेल तर एक लाख रुपये रक्कम आम्हाला दे. पैसे दिले नाही तर आमची संघटना चळवळीचे काम करते. आम्ही तुझ्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू’, अशी धमकी देत तिघांनी एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना एक सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीत साने चौक चिखली आणि ओटास्कीम निगडी येथे घडली.
संतोष रामा चव्हाण, अक्षय रामा चव्हाण (वय 26, दोघे रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड), सचिन गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. अक्षय चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अजय राजेंद्र जैन (वय 31, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी संतोष चव्हाण याने फिर्यादी यांना “तू गॅसचा बेकायदेशीर धंदा करतो. तुझी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी समाजात बदनामी करू. तुला प्रकरण मिटवायचे असेल तर एक लाख रुपये रक्कम आम्हाला दे. पैसे दिले नाही तर आमची संघटना चळवळीचे काम करते. आम्ही तुझ्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू. तुला भांड्याचे दुकान चालवून देणार नाही’. अशी धमकी दिली. आरोपींनी वारंवार फिर्यादी यांच्या दुकानात येऊन तसेच फोनवर पैशांची मागणी केली.
फिर्यादी यांच्या जैन नाकोडा मेटल्स या दुकानातून 20 हजार रुपये, अंकुश चौक ओटास्कीम निगडी येथून 20 हजार रुपये असे एकूण 40 हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा 20 हजार रुपयांची मागणी करत पैसे दिले नाही तर ठार मारतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.