शिरूर : “त्या’ विहीरीने घेतला लहानग्या शंभूचा जीव

मांडवगण फराटा – शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागातील रांजणगाव सांडस येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून एका 7 वर्षाच्या लहानग्याचा मृत्यू झाला. शंभू मधूकर रणपिसे (वय 7 वर्षे) असे मृत्यू झालेल्या या लहानग्याचे नाव आहे. हा मुलगा गेल्या तीन दिवसांपासून हा मुलगा गायब होता.

शंभूच्या कुटुंबातील नातेवाईकांनी त्याचा परिसरामध्ये खूप शोध घेतला; परंतु शंभू त्यांना आढळून आला नाही. शंभू दिव्यांग असून त्याला बोलताही येत नव्हते. तो रात्री घरापासून भटकला असावा असा अंदाज होता. कदाचित या भागातील बिबट्याने त्याच्यावर हल्ला केल्याची शंका असल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी परिसरातील सुमारे 200 एकर उसाच्या शेतात गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते; पण त्याला यश मिळत नव्हते.

अखेर तीन दिवसांनंतर या परिसरातील विहिरीत शंभूचा मृतदेह सापडला. ही विहिर रस्स्त्यालगत असून त्याला कोणतेही संरक्षक बांधकाम केलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने या विहिरीकडे दुर्लक्ष केले असून, परिसरातील रस्त्यालगत असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. वारंवार मागणी करूनही या विहिरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.