बेंगळुरू – सुवेद पारकर आणि सर्फराज खानच्या दमदार फलंदाजीनंतर डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलाणीने घेतलेल्या पाच विकेटस्च्या मदतीने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी मुंबईने उत्तराखंडविरुद्ध 794 धावांची निर्णायक आघाडी घेतली. या आघाडीसह मुंबईने उपांत्य फेरीतकडे आगेकूच केली आहे.
नवोदित सुवेद पारकरच्या द्विशतकानंतर मुंबईने पहिला डाव 8 बाद 647 धावांवर घोषित केला. यानंतर तिस-या दिवसाअखेर मुलाणीने पाच विकेट घेत उत्तराखंडचा पहिला डाव केवळ 114 धावांवर गुंडाळला. त्यामुळे मुंबईने पहिल्या डावात 533 धावांची आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या डावात मुंबईने दिवसाअखेर 3 बाद 261 धावा केल्या.
दिवसाच्या सुरूवातीला 2 बाद 39 धावांवरून पुढे खेळताना उत्तराखंडच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने त्याच्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाल्याने उत्तराखंडची 4 बाद 71 धावा अशी अवस्था झाली. यानंतर उत्तराखंडचा डाव सावरलाच नाही. त्यांनी केवळ 43 धावांत शेवटचे सहा विकेट गमावल्या. शम्स मुलाणीने 39 धावांत 5 गडी बाद केले. मोहित अवस्थीने 2 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.
उत्तर प्रदेशची उपांत्य फेरीत धडक
करण शर्माच्या 93 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर उत्तर प्रदेशने उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकचा 5 गडी राखून पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. कर्नाटकने पहिल्या डावात 253 केल्यानंतर दुसरा डाव 114 धावांत संपुष्टात आला. यानंतर निर्धारित लक्ष्यांचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशने 65.2 षटकांत 5 बाद 213 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला.
दुस-या डावात सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार पृथ्वी शॉ यांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी करत संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. पृथ्वी शॉने 72 धावांची खेळी केली, तर यशस्वी जैस्वाल 103 धावा करून माघारी परतला. अनुभवी आदित्य तारे 57 धावा करत अर्धशतक ठोकले. दिवसाअखेर अरमान जाफर 17, तर सुवेद पारकर 6 धावांवर खेळत आहे.